Breaking News

फुटाळा तलावाच्या कठड्यावर अपघात, क्लच ऐवजी एक्सिलेटर दाबल्याने उलटली कार


नागपूर,दि.8 : नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात सोमवारी भरधाव कार अनियंत्रित झाल्याने 20 फुट उंचावरून तलावाच्या कठड्याला तोडून तलावाच्या काठावरील जागेवर जोरदार आदळली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील आधुनिक सुरक्षा यंत्र असल्याने दोन्ही मित्र सुदैवाने बचावले. या अपघातात कारचा चुराडा झाला असून कारमधील ऋषभ म्हैसकर आणि विशेष भाजीपाले हे दोघेही गंभीर जखमी झाले.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बेडकर नगर, मानेवाडा येथे राहणारा ऋषभ नरेंद्र म्हैसकर (22) आणि त्याचा मित्र विशेष भाजीपाले (22) हे हजारीपहाड येथे राहणार्‍या मित्राच्या घरी गेले होते. वायुसेनानगर ते फुटाळा मार्गाने ते परत येत होते. ऋषभ हा कार चालविता होता. त्याला जास्त अनुभव नसल्यामुळे फुटाळा तलावाजवळ येताच त्याने क्लच दाबण्याऐवजी एक्सिलेटर दाबला. यामुळे 20 फुट उंचावरून कार फुटाळा तलावाचा सुरक्षा कठडा तोडून काठावरील जागेवर आदळली. वजन कमी जास्त झाले असते तर कार पाण्यात बुडाली असती. अपघाताच्या वेळी फुटाळ्यावर काही नागरिक मॉर्निंग वॉक करीत होते. त्या नागरिकांनी कारमधील दोन्ही युवकांना बाहेर काढले. लगेच पोलिसांना अपघाताची माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून उपचारार्थ रवाना केले.