Breaking News

नागपुरात भरदिवसा 8 लाखांची लूट; डोळ्यात तिखट फेकून हिसकले पैसे

नागपूर,दि.8 : कंपनीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जाणार्‍या दुचाकीस्वारांच्या डोळ्यात तिखट फेकून 8 लाख रुपयांची रोकड लुटण्याची घटना सोमवारी नागपुरात घडली. अरुण महादेव करारे असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, अरुण हिस्लॉप कॉलेजजवळील राजू टेडर्समध्ये कॅश कलेक्शनचे काम करतो. अरुण हा दुचाकीने गांधीबाग परिसरातील युनियन बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता. दरम्यान कस्तूरचंद पार्क जवळील शिवमणी कॉम्पलेक्स समोरील बँक ऑफ इंडियाजवळ दोन आरोपी चेहरा झाकून दुचाकीवर आले. त्यांनी जवळ येताच राजूच्या डोळ्यात तिखट फेकले आणि 7 लाख 68 हजारांची रोकड असलेली बॅग जबरीने हिसकावून पळून गेले. या घटनेनंतर नागरिकांनी गर्दी केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनिल बोंडे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिनी प्रथम अरुण करारे याला मेयो रुग्णालयात वैद्यकीय उपचाराकरिता नेले. त्यानंतर त्याच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही लुटीची घटना टीप देऊन कुणीतरी घडवून आणली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरु केले आहे. पोलिसांची दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिसांचा शोध सुरू केला आहे. लुटारुंचे वर्णन आणि दुचाकीच्या माहितीवरून आरोपींचा शोध घेणे सुरू केलेय. घटनेनंतर शहरात सर्वत्र शोध मोहीम राबवण्यात आली मात्र, आरोपीबाबत काहीच सुगावा लागला नाही.