Breaking News

सरकार मराठा आरक्षणावर गंभीर नाही : पृथ्वीराज चव्हाण

अहमदनगर, दि. 07, ऑगस्ट - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि एसआरए घोटाळ्यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं  आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र सरकार प्रामाणिक नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मराठा आरक्षणावर चर्चेऐवजी निर्णय जाहीर करण्याची  गरज आहे. मात्र सरकार वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून शेतकरी संपासारखी मराठा मोर्चात फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश  मेहतांचा राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशीची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सरकारला कर्जमाफी करायची नव्हती. सरकारने अडीच वर्ष टाळाटाळ केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. उत्तर प्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला मात्र  राज्यात शेतकर्‍यांच्या संपाच्या दबावात सरकारने घाईत निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. रोज नवे नियम आणि अटी लावून सरकार रक्कम कमी करत असल्याचा  आरोप त्यांनी केला.  बँकांत सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र कर्जमाफीचं स्वरुप अजूनही अस्पष्ट असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणावर बोलतांना त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसून सरकार कसली चर्चा करतंय, असा सवाल  त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा त्वरीत निर्णय घेऊन घोषणा करण्याची गरज आहे. मात्र सरकार वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून शेतकरी संपासारखी मराठा मोर्चात फूट  पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.