Breaking News

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत वर्ध्यातील काकडदरा गावाची बाजी

पुणे, दि. 07, ऑगस्ट - वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या काकडदरा या गावाने यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कपवर आपलं नाव कोरलं.  बक्षीस म्हणून ट्रॉफी  आणि 50 लाख रुपयांचा चेक या गावाला देण्यात आला.  याबरोबर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस दोन-दोन अशा एकूण 4 गावांना विभागून देण्यात आलं.  खटाव (जि.सातारा) तालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि.बीड) तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना 30 लाख रुपयांचे दुसरं बक्षीस विभागून देण्यात आलं. तर  माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज (जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना 20 लाख रुपयांचं तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात  आलं. महाराष्ट्रातील दुष्काळ हद्दपार करुन लोकांना पाणी जिरवण्याचं शिक्षण मिळावं या हेतूने गेल्या वर्षी या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. यंदा एकूण 30  तालुक्यांमधल्या शेकडो गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गावकर्‍यांच्या श्रमदानाने उभ्या राहिलेल्या या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  अभिनेता शाहरुख खान, नीता अंबानी आणि सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज उपस्थित होते.  पुण्यातील बालेवाडी इथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या  योजनेत सहभागी झालेल्या सर्व गावांना साडे सहा कोटींचे पुरस्कार शासनाकडून जाहीर झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्‍वासन दिलं. राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे. त्याचं प्रतीक म्हणून सरकारच्या  वतीने आम्ही 6.5 कोटींची बक्षीसं जाहीर करत आहोत. ही योजना जनतेची झाली म्हणून यशस्वी झाली, अन्यथा अन्य सरकारी योजनांप्रमाणे ती कागदावर राहिली  असती.जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण केलं तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर परत कर्जमाफीची वेळ येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याबद्दल आमीर खानने खंत व्यक्त केली. त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात  सहभाग घेतला. एवढ्या गावांतून या प्रसंगी लोक आलेत, याचा आनंद आहे. हे सर्व काम तुमच्या मेहनतीचं फळ आहे. यावर्षी तुम्ही जी कमाल केली आहे ते पुढील  वर्षी आणखी मोठी करू, असं आमीर म्हणाला.