Breaking News

जन्मापासूनच शंभूराजांवर नियतीचा घोर अन्याय-डॉ. शेटे

संगमनेर, दि. 28, ऑगस्ट - जन्मापासूनच नियतीने शंभूराजांवर घोर अन्याय केला. आपल्या स्वार्थासाठी इतिहासाचा सोयीने वापर करणार्‍यांनी त्यांच्या प्रगल्भ  चरित्राचे विकृतीकरण केले. संस्कृत पंडित, कविराज, महापराक्रमी, अध्यात्मिक जाण असलेले, चारित्र्यसंपन्न, शुर योध्दे, धुरंदर राजकारणी अशा बहुआयामी  शंभूराजांची ठायी ठायी बदनामी करणार्‍यांनी मृत्युनंतरही त्यांच्या चरित्रावर शितोंडे उडवण्याचे कारस्थान केल्याचे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक  डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.  संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, संगमनेर फेस्टिव्हलचे जनक मनिष  मालपाणी, प्रा. एस. झेड. देशमुख, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, मुख्याधिकारी सचिन बांगर, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष मनिष  मनियार, राजस्थान मंडळाचे कार्याध्यक्ष कैलास आसावा, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव वेणुगोपाल लाहोटी, गौरव कलंत्री आदी मंचावर उपस्थित होते.
डिजीटल इंडियाचा धागा पकडून यंदा संगमनेर फेस्टिव्हलचे दिमाखदार पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी रिमोट कंट्रोलची कळ  दाबताच मंचाच्या चहुदिशांनी आकर्षक फुलबाजे प्रज्ज्वलीत झाले आणि संगमनेर फेस्टिव्हलचे औपचारीक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. नगराध्यक्षा  दुर्गाताई तांबे यांनी ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या छोट्याशा संगमनेर शहराचा वारसा राजस्थान युवक मंडळाने पुढे नेल्याचे सांगीतले. फेस्टिव्हल म्हणजे  संगमनेरकरांसाठी आनंदाचे पर्वच असते. हर्षोल्हासात गणरायांच्या आगमनाच्या दुसर्‍या दिवसापासून मिळणारी विविध कार्यक्रमांची मेजवाणी संगमनेरकरांची सांस्कृतिक  भूक शमवते असेही त्या म्हणाल्या.
पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी प्रत्येक ठिकाणची माती, आकाश आणि पाणी तेथील संस्कृती घडवित असल्याचे सांगून संगमनेरची वैचारीक बैठक खूप  मोठी असल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे काम राजस्थान मंडळ अव्याहतपणे करीत आहे खरेतर ही गोष्ट प्रत्येक  संगमनेरकरासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रास्तविक भाषणात फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी यांनी संगमनेर फेस्टिव्हलच्या गेल्या नऊ वर्षांचा आढावा घेतला. सर्वांसाठी सर्वकाही या सूत्रानुसार गेल्या  नऊ वर्षात 80 ते 90 दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन झाले. संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून राज्यात लौकीक मिळवणार्‍या या महोत्सवात कलेच्या सर्व  प्रकारांचा समावेश करण्याचा आमचा सतत प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. राजस्थान मंडळाच्या सहकार्याने पोलीसांनी शहरातील विविध ठिकाणी बसविलेल्या सी. सी.  टी. व्ही कॅमेर्‍यांबाबत त्यांनी उपस्थितांना माहीती दिली. पोलीस-पब्लिक पार्टनरशिपचे (पी.पी.पी) सर्वोत्तम उदाहरण यातून उभे राहील्याचेही त्यांनी यावेळी  सांगीतले.
संगमनेरात बसविण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही कॅमेर्‍यांच्या उपक्रमाबद्दल पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, राजस्थान मंडळाचे  सदस्य सचिन पलोड व सुमीत अट्टल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या व्याख्यानाला संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली होती. सचिन पलोड यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन तर कैलास आसावा यांनी आभार मानले. गिरीश मालपाणी, सतिष लाहोटी, ओंकार बिहाणी, नितीन लाहोटी, अनिष मनियार, मधुसूदन नावंदर, संतोष  करवा आदींनी आजच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.