Breaking News

सांगली संस्थानच्या चोर गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना

सांगली, दि. 24, ऑगस्ट - सांगली संस्थानच्या चोर गणपतीची मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. 176 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या  या गणपतीची येथील गणपती मंदिरात अतिशय मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना झाली. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते भाद्रपद शुध्द पंचमीपर्यंत सांगली संस्थानचा  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यात भजन, निरूपण, मंत्र पठण, भजनी निरूपण व अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे. पंचमीला रात्री उत्सव  समाप्तीनिमित्त लळिताचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. गणपती मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या चोर गणपतीच्या दोन मुर्ती 176 वर्षापूर्वी कागदी  लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या आहेत. गणपती मंदिराचे मुख्य पुजारी रमेश पाटणकर व अशोक पाटणकर यांच्याहस्ते या चोर गणपतीची विधीवत पूजा करून  प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आता भाद्रपद शुध्द चतुर्थीला विजयसिंह पटवर्धन यांच्या वाड्यात या गणपतीची प्रतिष्ठापना होते. या गणपतीची मंदिरात आणून  पूजा केल्यानंतर पालखीतून सरकारी घाटावर लवाजम्यासह आणली जाते. आरती झाल्यानंतर तेथूनच वाड्यात आणून विजयसिंह पटवर्धन यांच्याहस्ते त्याची  प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुख्य गणपती मंदिरावर अत्यंत मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.