Breaking News

सेक्स वर्धक आयुर्वेदिक औषधात अ‍ॅलोपथीची भेसळ करून विक्री करणारे रॅकेट उघडकीस

औरंगाबाद, दि. 24, ऑगस्ट - आयुर्वेदिक औषधात अ‍ॅलोपॅथी रसायनाची मिसळ करून ती राजरोसपणे विकून ग्राहकांची फसवणूक करणार्या गुलमंडीवरिल दुकानावर  अन्न व औषध खात्याने छापा टाकला असून या दुकानदारा विरोधात तसेच राजस्थानमधील औषध निर्मिती करणा-या दोन कंपन्या विरोधात सीटी चौक पोलिसांत  गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी प्रेसनोटमध्ये याची माहिती दिली आहे. सुमारे 40 हजार रुपये किंमतीची औषधी जप्त करण्यात आली.
अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक माधव निमसे यांना आयुर्वेदाच्या नावावर खपवण्यात येत असलेल्या या भेसळीचा संशय आला. सुपारी हनुमान रोड येथील  श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडारातून नमुने घेवून त्यांनी या औषधाची प्रयोगशाळेत तपासणी केली असता. सेक्स वर्धक थ्री एक्स गुटिकामध्ये अ‍ॅलोपॅथीक सिल्डेनोफिल  सायट्रेट हे घटक द्रव्याचे मिश्रण केलेले आढळले. तसेच रुमावीन वटी मध्ये निमेसुलाईड व डायक्लोफेनॉक सोडियम या अ‍ॅलोपॅथीक औषधाची भेसळ  आढळली.त्यानंतर त्यांनी चौकशी करून दुकानदार सारंग जोशी ,राजस्थानमधील गंगानगर येथील प्रेमपालसिंग धुना आणि संतोष कुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला(रा.  गंगानगर, राजस्थान). या दोन कंपन्या विरोधात तक्रार देवून गुन्हा दाखल केला आहे. सदर कंपन्या आणि दुकानदार सुरूवातीला काहीच प्रतिसाद देत नव्हते. या  बाबत भेसळ व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.