Breaking News

उर्दू लोकराज्य स्पर्धापरिक्षा तयारीसाठी उपयुक्त - चिलवंत

औरंगाबाद, दि. 08, ऑगस्ट - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे उर्दू लोकराज्य हे मासिक आवश्य वाचायला हवे. शासनाच्या विविध  योजनांची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी उर्दू लोकराज्य मासिक हा विश्वासार्ह्य पर्याय असल्याचे औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी  सांगितले. उर्दू लोकराज्य मासिकाची माहिती जास्तीत जास्त उर्दू वाचकांपर्यंत पोहचावी यासाठी आयोजित शहरातील अमातुल्ला मोतीवाला हायस्कुल आणि इकरा उर्दू  बॉईज हायस्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत बोलत होते. पुढे बोलतांना चिलवंत म्हणाले की,  शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरमहा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराती या भाषेत लोकराज्य प्रसिध्द करण्यात येते. या  मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कल्याणकारी योजना, अल्पसंख्याकांच्या योजना, मंत्रीमंडळ निर्णय, महाराष्ट्राची  अनुषांगिक माहिती अशा अनेक विषयांची यामध्ये सविस्तर माहिती देण्यात येते. उर्दू लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असून वर्गणीदाराला वर्षभर  अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात. तसेच हे अंक बुक स्टॉलवर देखील विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व उर्दू भाषिक नागरिकांनी उर्दू  लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी चिलवंत यांनी केले. यावेळी अमातुल्ला मोतीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक खान जमिल अहेमद बोलतांना  म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील उर्दू भाषिक नागरिकांना शासनाच्या योजना, विविध उपक्रम, शासन निर्णय याची माहिती देणारे उर्दू लोकराज्य हे एकमेव  मासिक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून जास्तीत जास्त वाचकांनी हे लोकराज्य वाचावे असेही  त्यांनी यावेळी सांगितले . इकरा उर्दु बॉईज हायस्कूलचे प्राचार्य सिद्दीकी मोहम्मद सलाउद्दीन म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविधांगी वाचनाची आवड जोपासणे गरजेचे  असून यासाठी उर्दूतून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र अत्यंत उपयुक्त असून शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त क्षमता विकासासाठी  लोकराज्य विद्यार्थ्यांना उपयोगी असल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार सईद शेख यावेळी म्हणाले की, उर्दू लोकराज्य मासिक हे उर्दू भाषिक नागरिक आणि स्पर्धा  परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून याची वार्षिक वर्गणी देखील अत्यंत माफक आहे. तरी जास्तीत जास्त उर्दू भाषिक नागरिकांनी  वर्गणीदार होवून शासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे असेही ते यावेळी म्हणाले.