Breaking News

गोव्यात पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पर्रिकरांनी हक्क बजावला!

पणजी (गोवा), दि. 23, ऑगस्ट - गोव्यातील पणजी आणि वाळपई मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि  आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या बरोबरच सरकारचं भवितव्य पणाला लागलं आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठांसह तरुणांनी  मतदानासाठी केंद्रांवर हजेरी लावली आहे. संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.  मुख्यमंत्री पर्रिकर, आरएसएस नेते सुभाष वेलिंगकर यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
पणजी आणि वाळपई मतदारसंघात एकूण सात उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. पणजी पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर,  काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर आणि अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा असे चार उमेदवार रिंगणात आहेत. परंतु खरी  लढत मनोहर पर्रीकर आणि गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. तर वाळपई मतदारसंघात भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, काँग्रेसतर्फे रॉय नाईक  आणि अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 उमेदवार असले तरी विश्‍वजित राणे आणि रॉय नाईक यांच्यात  सामना रंगणार आहे.