Breaking News

कार्यकारी अभियंता बागडी यांची खातेनिहाय चौकशी शक्य

त्रिसदस्यीय समितीची विभागीय आयुक्तांची शिफारस  जिल्हाधिकारी कार्यालयाचाही मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार

कुमार कडलग/ नाशिक, दि. 3, ऑगस्ट - नाशिक सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्या  कार्यशैलीविषयी तक्रारींचा वेग वाढला असून एका संघटनेने केलेल्या तक्रारीवरून येत्या काही दिवसात कार्य. अभियंता बागडी यांची खाते निहाय चौकशी अटळ  असल्याचे संकेत आहेत.
या संदर्भात खास सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की शैक्षणिक जीवनात विशेष प्राविण्य मिळविणारा विद्यार्थी अशी ख्याती असलेले कार्यकारी अभियंता  शिवप्रसाद  बागडी हे सुवर्णपदक मिळवून अभियंता झाले. आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत हुशार व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत. मात्र ही हुशारी ते कार्यरत असलेल्या सार्वजनिक  बांधकाम खात्याच्या विशेषतः आदिवासी बांधवांच्या कल्याणात का दिसत नाही. त्यांच्या हुशारीची नकारात्मक चर्चा का होते, असे कोडे मुख्य अभियंत्यापासून मजूर  मुकादमापर्यंत तर पडलेच आहे. शिवाय लाभार्थी देखील या चर्चेमुळे बुचकाळ्यात पडले आहेत. साधारण दोन वर्षापुर्वी बागडी यांनी नाशिक साबां प्रादेशिक विभागात  उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर (पदभार स्वीकारतांना झालेले नाट्यही रंजक आहे.) आजपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक काम  वादग्रस्त ठरले किंवा ठरविले गेले. त्र्यंबक रस्ता असो नाही तर निवृत्तीनाथ विश्‍वस्त संस्थेचे भक्त निवास असो, आदिवासी आश्रम शाळेच्या निधीचा विषय असो  नाहीतर आदिवासी भागातील रस्त्यांवर खर्च झालेल्या निधीचा विषय असो, त्यानंतर रस्त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी अधोगतीच्या विषयावर अधिक चर्चा  होतांना दिसते.
बागडी यांच्या या कार्यशैलीविषयी दिवसागणिक तक्रारी वाढत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हाधिकारी,  विभागीय आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना पाठपुरावा करून बागडी शैलीची कुंडलीच त्यांच्या समोर ठेवली आहे. या सुत्रांकडून मिळालेल्या  माहीतीनुसार या कुंडलीची संबंधित यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून बागडी यांच्या कार्यशैलीची विभागीय चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. या शिवाय  जिल्हाधिकारी कार्यालयानेही या कार्यशैली संदर्भात थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. (उद्याच्या अंकात - सोलापुरी  आशीर्वादाने नाशिक साबांत रूजली पाळेमुळे)