Breaking News

तालुक्यातील आढळगाव परिसरात अपघात एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती चितांजनक


श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव शिवारातील रस्त्यावर रात्री 8 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील भरत आगलावे हा दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढवळगाव येथील भरत आगलावे, मयूर वेताळ आणि राजू वेताळ हे तिघे आपल्या दुचाकीवरुन (एमएच 16 एडब्लू- 1018) जामखेड येथे निघाले होते. आढळगाव येथील सिध्देश्‍वर मंदिरानजिक असणार्‍या पुलावरुन दुचाकी पुढे गेली, त्याच दरम्यान समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. 

ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीसह दुचाकीवरील तिघेजन रस्त्याच्या बाजूला असणार्‍या खड्यात उडून पडले. यात भरत आगलावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. आढळगाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना खड्यातून बाहेर काढून त्यांना रूग्णवाहिकेतून श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.