Breaking News

छिंदमच्या प्रतिमेस महिलांचे जोडे मारो

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिमेस मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महिलांनी जोडे मारुन त्याला तमस मृतांजली वाहिली. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, लतिका पाडळे, सखुबाई बोरगे, अनिता कासार, शशीकला गायकवाड, शहानूर शेख, उर्मिला शिंदे, ताराबाई वाव्हळ, पोपट गायकवाड, वंदना शेंडगे, गीता डहाळे, हिराबाई पांडूरंग आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आलेल्या घरकुल वंचितांच्या बैठकित प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. घरकुल वंचित कुटुंबातील महिलांना उघड्यावर आंघोळ करण्याची वेळ येत असल्याने सोमवार दि.5 मार्च रोजी लज्जा रक्षण सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला लॅण्ड पुलिंग योजना राबवून, पंतप्रधान आवास योजनेला गती देण्याची मागणी केली जाणार आहे. तर पंतप्रधान मोदीची प्रतिमा ठेवून गटारी समोर स्लम बुफे डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. 

झोपडपट्टीतील प्रश्‍न अधिकारी व लोकप्रतिनिधींना समजण्यासाठी हे आगळे वेगळे आंदोलन केले जाणार असून, या डिनरसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अ‍ॅड.कारभारी गवळी म्हणाले की, अनेक घरकुल वंचित झोपडपट्टीत राहत असून, घरे नसल्याने आई बहिणींना उघड्यावर आंघोळ करावी लागत आहे. याची जाणीव पंतप्रधानांना नसून, त्यांनी फक्त आवास योजनेची घोषणा केली. 

साडेतीन वर्ष उलटून देखील घरकुल वंचितांना घरकुल उपलब्ध होण्यासाठी या योजनेची कार्यवाही होत नसल्याने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंघोळ करुन, लज्जा रक्षण सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकणार्‍या समाजातील छिंदम प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे. अशांनी जमीनी लाटून, घरे बळकावून काळ्या पैश्याने सत्ता मिळवली. या सत्तेचा माज त्यांना चढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.