Breaking News

मुंबई-गोवा महामार्गाची 80 टक्के दुरुस्ती पूर्ण - चंद्रकांत पाटील

रत्नागिरी, दि. 21, ऑगस्ट - मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे भरण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून राहिलेले काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल.  तथापि गणेशोत्सव कालावधीत अतिवृष्टी झाली तर तत्काळ रस्स्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय  महामार्ग तसेच प्रमुख मार्गावर दर पन्नास किलोमीटर अंतरावर पथक कार्यरत ठेवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
श्री. पाटील यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाची पाहणी केली. आंबोली- नांगरतास वाडी, आंबोली घाट रस्ता, झाराप तिठा, कुडाळ, पावशी,  कणकवली तळेरे, वैभवाडी तसेच गगनबावडा घाटरस्त्यांची पाहणी त्यांनी केली. खड्डे बुजविण्याच्या कामाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक  बांधकाम विभागाचे प्रधान सचिव ए. के. सिंग, सी. पी. जोशी, सचिव यांच्यासह महामार्ग आणि बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार  वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, संदेश पारकर, अतुल काळसेकर, संजय पडते, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, अभय शिरसाट  आदी पक्षीय पदाधिकारीही दौर्‍यात सहभागी झाले होते.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हजारोंच्या संख्येने चाकरमानी कोकणवासीय गणपतीसाठी गावाला येतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा  यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त ठेवण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करुन श्री. पाटील म्हणाले की,  अधूनमधून होणारा पाऊस, संबंधित ठेकेदारांकडून झालेला विलंब यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्यास थोडा उशीर झाला. तथापि आत्तापर्यंत 80 टक्के काम  झाले आहे. उर्वरित काम दोन दिवसांत निश्‍चित पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.सावंतवाडी, झाराप तिठा, कुडाळ, ओरोस शासकीय  विश्रामगृहावत जनतेमार्फत विविध निवेदनांचा स्वीकार श्री. पाटील यांनी केला.