Breaking News

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणसाठा 78 टक्क्यांवर

नाशिक, दि. 22, ऑगस्ट - गेल्या तीन आठवड्यापासून गायब झालेल्या पावसाला रात्रीपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली. काल दिवसभर नाशिक शहर व  परिसरात पावसाची हजेरी होती. त्यानंतर सोमवारीही पाऊस कायम असून जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून धरणसाठा 78  टक्क्यावर पोहचला आहे. आज त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी,सुरगाणा, पेठ व नाशिक तालुक्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकरी  वर्गात आनंदाचे वातावरण असून या पावसाने पिकांना जीवनदान भेटले आहे.
दि.21 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात सर्व तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यात नाशिक 31, इगतपुरी 98, दिंडोरी 37, पेठ 67,त्र्यंबकेश्‍वर  119, मालेगाव 22, नांदगाव 96, चांदवड 17.6, कळवण 22, बागलाण 27, सुरगाणा 93, देवाला 27, निफाड 13, सिनार 52, येवला 57 अशी एकूण  सरासरी 51.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून पाणी साठा 78 टक्यावर  पोहचला आहे. त्यात आळंदी, वाघाड, ओझरखेड,भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या आठ धरणात 100 टक्कसाठा झाला आहे. तर गंगापूर  91, कश्यपी 99, गौतमी गोदावरी 99, पालखेड 82, करंजवन 96, पुणेगाव 84, तिसगाव 89, दारणा 95, मुकणे 71, कडवा 90,चनकापूर 77, गिरणा  52,पुनद 85 टक्के पाणी साठा आहे.