Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात 2 बिबटे मृतावस्थेत सापडले

रत्नागिरी, दि.30:  राजापूर तालुक्यातील कळसवली गावातील सतीचा नाळ येथे रस्त्याच्या कडेला सहा वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याची माहिती राजापूर वन विभागाला मिळता परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील, राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, विजय म्हादये, कृष्णा म्हादये आणि अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची पाहणी केली असता त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्या नाकातोंडातून रक्तस्रावही सुरू होता, अशी माहिती वन विभागाने दिली. मृत बिबट्या नर जातीचा असून तो सुमारे सहा वर्षांचा होता. त्याची लांबी 212 सेंटीमीटर, तर उंची 72 सेंटीमीटर आहे. नाकातोंडातून रक्तस्राव होत असलेल्या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती मिळाली नाही. अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. दुसरा बिबट्या संगमेश्‍वर तालुक्यातील देवरूखजवळच्या मारळ येथे सापडला. मारळच्या डांगेवाडीतील ग्रामस्थ पांडुरंग सूर्या परसराम यांना आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घराशेजारीच बिबट्या ओरडत असल्याचे दिसले. त्यांनी पाहणी केली असता एक बिबट्या जखमी अवस्थेत विव्हळत पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याची खबर पोलिस पाटील देवदास सावंत यांना दिली. त्यांनी खातरजमा करून वन विभागाला कळविले. वनपाल विलास मुळ्ये यांच्यासह वनरक्षक दिलीप आरेकर, सागर गोसावी घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच बिबट्याने मान टाकली आणि तो गतप्राण झाला. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी पाहणी केली असता त्याच्या पायाला मोठी जखम झाल्याचे दिसून आले. ही जखम जुनी असल्याने त्यातून विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. डॉक्टर नागले यांनी त्याचे विच्छेदन केले. तेव्हा पायाला गँगरीन झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सापडलेला बिबट्या नर असून पूर्ण वाढ झालेला 10 ते 12 वर्षांचा होता, असे सांगण्यात आले. संगमेश्‍वर तालुक्यात गेल्या 3 महिन्यांत बिबट्या सापडण्याची ही चौथी घटना आहे. जून महिन्यात आंबा घाटात बिबट्या सापडला त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. गेल्या महिन्यात साखरप्यातील गुरववाडीत फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आले. याच महिन्यात निवे खुर्द येथे 23 ऑगस्ट रोजी शेणकीत बिबट्या मृतावस्थेत सापडला होता. आज मारळमध्ये जिवंत अवस्थेत दिसलेला बिबट्या जागेवरच मरण पावला.