Breaking News

मार्डीच्या यमाई मंदिरातून चार वर्षांत 250 तोळे सोने गायब

सोलापूर, दि. 24, ऑगस्ट - मार्डी येथील यमाई देवी देवस्थान ट्रस्टमधील कोट्यवधीच्या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्तांना  देण्यात आला आहे. मात्र, त्याप्रकरणी अद्याप कारवाई झाली नाही.
दरम्यान, केवळ चार वर्षांत 250 तोळे सोने गायब झाल्याचे आणि 1960 पासूनच्या दानपेटीतील रकमेचा हिशेबच नसल्याचे चौकशीत उघड झाल्याची माहिती  मिळाली आहे. इतका मोठा घोटाळा होऊनही कारवाईला विलंब होत आहे. मार्डीच्या यमाई मंदिरातील ट्रस्टने अपहार केल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात  आली होती. 80 तोळे सोन्यांसह इतर ऐवज गायब झाल्याचे त्या तक्रारीत म्हटले होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने निरीक्षकामार्फत या प्रकरणाची चौकशी केली. या  चौकशीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात आला. अद्याप त्यावर काही हालचाल झाली नाही. दरम्यान, चौकशीत ट्रस्टकडील चार  वर्षांच्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यावरून 250 तोळे सोने गायब असल्याचे निदर्शनास आले. 1960 पासूनच्या दानपेटीच्या रकमेचा हिशेब नसल्याचे उघड झाले.  त्यामुळे उर्वरित कालावधीचा हिशेब केल्यास हा आकडा कोटीच्या पुढे जाईल. सोन्याबरोबरच चांदीचा कलश, इतर नोंदी असलेल्या वस्तूही गायब आहेत. अहवालात  या बाबीचा उल्लेख असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. अहवाल न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगत संबंधित अधिकार्‍यांनी माहिती देण्यास नकार दिला.  सध्या अस्तित्वात असलेले ट्रस्ट बरखास्त करून नवी ट्रस्ट तयार करण्याची शिफारस अहवालात करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यात गावातील सर्व घटकांना  प्रतिनिधित्व देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.