Breaking News

पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन 1 सप्टेंबरला

पुणे, दि. 21, ऑगस्ट - पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ॠपुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन येत्या 1 सप्टेंबर रोजी होत असून, या  महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती माजी खासदार आणि महोत्सवाचे संयोजक सुरेश कलमाडी यांनी रविवारी पत्रकार  परिषदेत दिली. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी 4.30 वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी  पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पुणे जिह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी  मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन  अभिनेत्री हेमामालिनी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदा अभिनेते शेखर सुमन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आय.टी. तज्ञ आनंद खांडेकर, क्रिकेटपटू केदार जाधव, यांना ॠपुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’  देऊन उद्घाटन सोहळ्यात गौरविले जाणार आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवास 125 वर्षे होत असून त्यानिमित्त पुण्यातील कसबा गणपती मंडळ, केसरी  गणेशोत्सव, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
यंदाच्या उद्घाटन सोहळ्यास तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने प्रारंभ होईल. यानंतर नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कला दिग्दर्शन केलेली गणेशवंदना  सादर होईल. स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेवर आधारित या सिनेकलाकार ‘गणेशवंदना’ सादर करतील. श्री शिवछत्रपतींचे स्फूर्ती गीत व महाराष्ट्राच्या  संस्कृतीवरील गीत यावर सादर होणारा ॠमहाराष्ट्राच्या देशा - शिवबाच्या देशा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. पाठोपाठ पुणे जिल्हा मल्लखांब  संघटना आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींची दोरीवरील व मुलांची जमिनीवरील मल्लखांब प्रात्यक्षिके सादर होतील. यामध्ये 15 मुले व 15  मुली सहभागी होणार असून एकाच वेळी ही दोन्ही प्रात्यक्षिके स्वतंत्रपणे सादर केली जातील. धनंजय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित भोसले व  सचिन परदेशी यांनी याचे नियोजन केले आहे. यानंतर ‘लावणी व टॉलिवूड बॉलिवूड रिमिक्स’ हा फ्युजन कार्यक्रम सादर होईल.