Breaking News

शहापूर तालुक्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडले, पुराची भीती

ठाणे, दि. 21, ऑगस्ट - ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने शनिवारपासून चांगलीच हजेरी लावल्यामुळे शहापूर तालुक्यातील सर्व धरणांचे दरवाजे  उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहापूर तालुक्यात पुर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला  देण्यात आला असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांनी दिली. शहापूर तालुक्यात येणा-या  तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा व भातसा धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत . तानसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून मोडक  सागर धरणाचे दोन, मध्य वैतरणा धरणाचे तीन आणि भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. भातसा धरणाचे दरवाजे दीड मीटरने  उघडल्याचे समजते. मात्र, या विसर्गाने परिसरातील मानवी वस्तीस धोका पोहोचणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत ठाणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 68.50 मिमी तर आतापर्यंत 2350.50 मिमी  पावसाची नोंद करण्यात आली आहे.