भाऊ रंगारी मंडळाची याचिका; सरकारला स्पष्टीकरणासाठी 14 दिवस
गणेशोत्सवाचे जनक म्हणून भाऊ रंगारी यांचे नाव जाहीर करा
पुणे, दि. 24, ऑगस्ट - भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली असून पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच असून गणेशोत्सव टिळकांनी नव्हे तर भाऊ रंगारी यांनी सुरु केल्याचा दावा गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी केला आहे. वारंवार सरकारकडे मागणी करून देखील कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही त्यामुळे अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली असून 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली.1892 साली आणखी तीन मंडळांकडून गणेशाची स्थापना केली होती.