Breaking News

औट्रम घाटातील बोगद्याचे संकल्पचित्र मंजूर

औरंगाबाद, दि. 20, जुलै - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या तिसर्या पॅकेजचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या कन्नड येथील औट्रम घाटाच्या  बोगद्याचे डिझाइन नुकतेच निश्‍चित झाले आहे. घाटात बोगदा करून त्यात करावयाच्या रस्त्यासाठी सहा प्रकारचे डिझाइन देण्यात आले होते. दिल्लीतील राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण कार्यालयाने त्यातील दुस-या क्रमांकाचा पर्याय निवडल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्ग 211च्या तिस-या टप्प्याच्या  कामासाठी निविदा मागविण्यात
आल्या होत्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या टप्प्याचे तीन उपटप्पे पाडण्यात आले. त्यात औरंगाबाद ते तेलवाडी, औट्रम घाट आणि बोड्रे ते धुळे  असे टप्पे केले गेले. बोड्रे ते धुळे रस्त्यासाठी कंत्राटदार निश्‍चित झाला आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा औट्रम घाटातील बोगदा आणि रस्त्याचा आहे. स्वित्झर्लंडच्या  अँबार्क इंजीनिअरिंग कंपनीला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याची जबाबदारी दिलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या कंपनीने बोगदा आणि  आतील रस्त्याचे सहा पर्याय सुचविले होते. त्यासंदर्भात तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीत एनएचएआयच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. तीत दुसर्या क्रमांकाचा पर्याय  निवडला गेला. घाटात बोगदा तयार करून त्यात सात किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. घाटातून रस्ता करताना समुद्रसपाटीपासूनचे अंतर, डोंगरकडांची उंची,  रस्ता दीर्घ काळापर्यंत सुरक्षित राहावा, यासाठी मोजमापानुसार बोगद्यातून पूल करण्याचे प्रस्तावित आहे. ज्यामुळे वाहनांच्या सुरक्षितेतला अधिक चांगला पर्याय  उपलब्ध राहणार आहे.