Breaking News

ढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्याची अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड, दि. 01 - आषाढी एकादशीनिमित्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी मराठवाडयाच्या विविध ठिकाणाहून जाणार्या लाखो भाविक -भक्तांच्या सोयीसाठी नांदेड,  औरंगाबाद आणि अकोला येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष  खा.अशोकराव चव्हाण यांनी द.म.रे.चे महाव्यवस्थापक आणि नांदेड विभागाचे व्यवस्थापक यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठया प्रमाणावर आहे. येत्या दि.4 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे  भव्य यात्रा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.त्यानिमित्ताने मराठवाडयातील शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक पंढरपूर येथे पांडूरंगाच्या  दर्शनासाठी मोठया संख्येने अतिशय श्रध्दायुक्त भावनेने दरवर्षी जात असतात. परिणामी पंढरपूर नगरीत विठ्ठल नामाचा गजर करीत लाखो वारकर्यांची अलोट गर्दी  उसळते परंतु आवश्यक त्या ठिकाणाहून रेल्वेची सोय नसल्यामुळे लाखो विठ्ठल भाविक-भक्तांची मोठी गैरसोय होत असते. ही बाब गांभीर्यपूर्वक लक्षात घेवून रेल्वे  प्रशासनाने आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार्या लाखो वारकर्यांच्या सोयीसाठी मराठवाडयातील नांदेड,औरंगाबाद आणि अकोला येथून  पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडयांची सोय उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.