Breaking News

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणार्‍या डॉक्टरांविरूद्ध कठोर कारवाई : जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 21 - वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असणार्‍या डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायासोबत समाजामध्ये मुला-मुलींच्या नैसर्गिक समानता ठेवण्यासाठी सहकार्य  करावे. आपली सामाजिक बांधिलकी समजून डॉक्टरांनी गर्भलिंग निदान करणार्‍या जोडप्यांना मुलींच्या जन्माचे महत्व पटवून द्यावे. तसेच त्यांच्या विचारांमध्ये बदल  घडवून आणावेत. समाजात चांगल्याप्रमाणे काही वाईट प्रवृत्तीही कार्यरत असतात. त्यामध्ये वैद्यक व्यवसायही सुटला नाही. कुणी वैद्यकीय व्यावसायिक अवैध गर्भलिंग  निदान अथवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी आज दिला.
पीसीपीएनडीटी कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय/खाजगी सोनोग्राफी केंद्रधारकांच्या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन आय.एम.ए सभागृहात करण्यात आले  होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेवती  देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे, सरकारी  अभियोक्ता ड. संतोष खत्री, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. आर मकानदार, आयएमए अध्यक्ष डॉ. एल. के राठोड, फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. डी.डी कुळकर्णी,  रेडीओलॉजीस्ट  डॉ. राजीव भागवत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन म्हणाले,  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहेत. प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांनी  पीसीपीएनडीटी कायद्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत श्री. गोफणे यांनी आईसी क्टीव्हीटीबाबत सादरीकरण करून जिल्ह्यातील मुलींच्या  जन्मदराबाबत माहिती दिली. तसेच डॉ. राठोड, डॉ. भागवत, डॉ. कुळकर्णी यांनी सोनोग्राफी केंद्रधारकांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत उपस्थित सोनोग्राफी केंद्रधारकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेला डॉ. वैशाली पडघान, डॉ. एम. ए चाटे, डॉ. बोथरा, डॉ.  भवटे, डॉ. एस.आर मनवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम कुटूंबे, जिल्ह्यातील स्त्री रोग तज्ज्ञ, सोनोग्राफी केंद्रधारक, एमटीपी केंद्रधारक, तालुका आरोग्य अधिकारी  व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संचलन एस. बी सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन ड. वंदना काकडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता  पीसीपीएनडीटी विभागातील कर्मचारी के. पी भोंडे व अन्य कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.