Breaking News

पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासाचा वाद रंगला

पुणे, दि. 20, जुलै - आगामी गणेशोत्सवासाठी मंडळांना 1 ऑगस्टपासून विविध परवाने दिले जाणार आहेत. हे परवाने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने  देण्याची व्यवस्था महापालिकेच्या विविध 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आयोजित केलेल्या  आढावा बैठकीमध्ये पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासाचा वाद रंगला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही गणेशोत्सवाचे आयोजन, नियोजन आणि त्याची रुपरेशा ठरविण्यासाठी मंगळवारी महापालिकेतर्फे शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, प्रतिष्ठीत नागरिक, नगरसेवक, पोलीस अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, दक्षिण विभागाचे अतिरीक्त आयुक्त रविंद्र शेणगांवकर, विशेष शाखेचे  पोलीस उपायुक्त बावीसकर, परिमंडल एकचे उपायुक्त बसवराज तेली, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते  श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी  उपस्थित होते.
महापौर टिळक यांनी गणेश मंडळासाठी लागणारे परवाने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 1 ऑगस्टपासून पालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दिले  जातील, असे जाहीर केले. 2016 च्या गणेशोत्सवाचे पारितोषिक वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी महापालिकेने 2 कोटी  रुपयांची तरतूद केली आहे. यातून 5 हजार ढोल ताशांचे एकत्र वादन, पताका, वेबसाईट, गणेशोत्सवासंबंधीचे फोटो प्रदर्शन, विद्यार्थ्यांकडून एकत्रीत गणेशमूर्ती तयार  करुन घेणे, परदेशी पाहुण्याच्या भेटी, मिरवणुकीत सामिल होणार्या मंडळांना स्मृतीचिन्हे असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
त्यानंतर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या विविध परवानग्या घेण्यासाठी येणार्या अडचणी आणि इतर समस्यांचे पाढे वाचले. यावर पोलीस आयुक्त रश्मी  शुक्ला यांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मंडपाचे परवाने सुरू झाल्याशिवाय पोलीस परवाने देणे शक्य  नाही, असे सांगितले. पोलीस परवानेही 1 ऑगस्टपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दिले जातील. सर्व कागदपत्रांची पुर्तता करणा-या मंडळास 2 दिवसात परवाना  देण्याची घोषणाही केली. तसेच गणेशोत्सवात 4 दिवस 12 वाजेपर्यंत स्पिकरला परवानगी दिली जाणार आहे, याबाबतचा अद्यादेश आला नसल्याचेही सांगितले.
दरम्यान, भाऊ रंगारी यांनी पुण्याचा गणेशोत्सव सुरू केला आहे. त्यांना मान सन्मान मिळावा, कोणी गणेशोत्सवाचा चुकीचा इतिहास जगभरात पसरवू नये, अशी  मागणी यावेळी भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी केली. त्यावर शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांकडे येणारा गणेशोत्सव 125 वा आहे की  126 वा आहे हे जाहीर करण्याची विनंती केली. गणेशोत्सवाच्या इतिहासाच्या वादात महापालिकेने पडू नये, असे मत व्यक्त केले. या वादात भाजपचे नगरसेवक धिरज  घाटे, साखळीपीर तालीम मंडळाचे रविंद्र माळवदकर आणि इतरांनी उड्या घेतल्या. त्यावर सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते यांनी लोगोमध्ये कोणाचाही फोटो न  वापरता आणि वर्षाचा उल्लेख न करता उत्सव साजरा करण्याची सूचना मांडली. त्याला स्थायीचे अध्यक्ष मोहोळ, अरविंद शिंदे आणि चेतन तुपे यांनी सहमती  दर्शवली.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मानाच्या पाच गणपतींची मिरवणुका पुढे गेल्यानंतर पाठीमागील गणेश मंडळांच्या मिरवणुकांना पोलीस पुढे रेटतात. मानाच्या मंडळांना  जेवढा वेळ पोलीस देतात, तेवढ्या वेळात इतर मंडळांना मिरवणूक संपवावी लागते. पोलीस इतर मंडळांना सापत्न वागणूक देतात. मानाचे 5 गणपती म्हणजे पुण्याचा  गणेशोत्सव नाही, अशा भावनाही यावेळी काही कार्यकत्यांनी व्यक्त केल्या.