Breaking News

प्रसूती ’नैसर्गिक की सिझेरियन’; ओएनपीच्या ‘मॉम’ला सुरुवात

पुणे, दि. 20, जुलै - महिलेची प्रसूती ही नैसर्गिक व्हावी की सिझेरियन याचा निर्णय प्रसूतीवेळी त्या महिलेच्या स्थितीवर तेथे उपस्थित असलेले स्त्रीरोग तज्ज्ञच घेत  असतात. मात्र डॉक्टर पैसे उकळण्याच्या हेतूने सिझेरियन करतात, असा आरोप अनेकदा केला जातो. यावर उपाय म्हणून गेल्या 60 वर्षांपासून अधिक काळ महिला  आणि बालआरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या ऑईस्टर अ‍ॅण्ड पर्ल ग्रुपच्या माध्यमातून ‘मास्टर्स ऑफ मॅटर्निटी’ अर्थात ‘मॉम’ हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत  आहे.
या उपक्रमाअंतर्गत केवळ 29 हजार 999 रुपयांमध्ये आवश्यकतेनुसार नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन करण्यात येणार आहे. वर्षभरात अशा पद्धतीने ओएनपी  रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही तब्बल 600 प्रसूती करणार असल्याची माहिती ऑईस्टर अ‍ॅण्ड पर्ल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. अमिता फडणीस यांनी  दिली. पत्रकार परिषदेत डॉ. फडणीस बोलत होत्या.
डॉ. सुचेता पारटे, डॉ. मीनल मेहेंदळे आणि डॉ. अंबालाल गुरम आदी स्त्रीरोगतज्ज्ञ हेही यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाची अधिक माहिती देताना डॉ. फडणिस  म्हणाल्या, की श्री क्लिनिक आणि त्यानंतर ऑईस्टर अ‍ॅण्ड पर्ल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गेली 60 वर्षे महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहोत.  यादरम्यान घरातील महिलेची प्रसूती ही बर्‍याचदा संपूर्ण कुंटुंबासाठी मानसिक दडपणाबरोबरच आर्थिक दडपण देणारी असते. याचा आम्हाला अनुभव आला.
त्या म्हणाल्या की, महिला आणि बाळाला सर्वोत्तम सेवा मिळण्याबरोबरच खर्चाची चिंता मिटावी आणि त्यासाठी करावी लागणारी तरतूद नेमकी किती असेल याचा  ठोस अंदाज रूग्णांच्या नातेवाईकांना आधी यावा यासाठी काय करता येईल, असा विचार गेली अनेक वर्षे आम्ही करीत होतो. याच संकल्पनेतून सामाजिक  बांधिलकीच्या भावनेतून आम्ही ‘मास्टर्स ऑफ मॅटर्निटी’ अर्थात ‘मॉम’ हा सर्वसमावेशक प्रसूती योजना हा उपक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.