Breaking News

जळगावातील अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त

जळगाव, दि. 20, जुलै - शहरातील महत्त्वाच्या अशा अजिंठा चौफुलीवर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने या चौकातील चारही बाजुंनी झालेले  अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. 
या अतिक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूचे सातपुडा अ‍ॅटोमोबाईलजवळील अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईत स्वत: जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त  किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह पोलीस ताफा तैनात होता.
अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूने प्रचंड वाहतूक दिवसरात्र सुरू असते. 60 फुटी महामार्ग व 32 फुटी औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग दोन्ही बाजूने अतिक्रमणे झाली  आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ब-याच वेळेस अपघातही होत असतात. ही बाब लक्षात घेऊन या चौकातील अतिक्रमणे  काढण्यास आज सुरुवात झाली. दुपारी 4 ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत साडे पाच तास ही मोहीम सुरू होती.
चौकात औरंगाबादकडून येणा-या रस्त्याने डाव्या वळणावर सातपुडा अ‍ॅटोमोबाईलजवळ श्रीकृष्ण मंदिर आहे. 1983 मध्ये हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले आहे.  वळणाच्या ठिकाणी असलेले हे मंदिर 32 फुटी औरंगाबादकडे जाणा-या राज्य महामार्गावर येते. औरंगाबाकडून येणा-या डाव्या वळणावरील या जागेवर मोठे वृक्ष व  त्याचा आधार घेऊन काही अतिक्रमणे होती. यात पाणपोई, जुन्या फर्निचर विक्रीचे दुकान व त्याचाच आधार घेऊन वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागत असतात.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असे. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. दुपारी 4.30 वाजता या कारवाईस प्रारंभ झाला. तीन जेसीबी व ट्रकटर कारवाईसाठी आणले होते.  जेसीबीद्वारे मंदिराची भिंत, परिसरातील वड, उपंपळ, निंब, अशी जवळपास 14 लहान, मोठी झाडे तोडण्यात आली.