Breaking News

गँगमनच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा अपघात टळला

जळगाव, दि. 20, जुलै - भुसावळ रेल्वेतील गँगमन (ट्रॅकमन) मोहमद आदम अ.गनी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा अपघात टळून मोठी दुर्घटना  टळली. भुसावळ-खंडवा (दिल्ली मार्ग) या मुख्य रेल्वे मार्गावर खांब क्रमांक 444-445/29 या दरम्यान, मुख्य रेल्वे मार्ग तुटल्याचे गॅगमनच्या लक्षात आले त्यामुळे  यामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. 
बुधवारी मध्यरात्री 12.50 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून गाडी क्रमांक 21147 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन ही गाडी निघाली. तिने स्थानक सोडल्यानंतर ती  वेग घेत असतानाच काही अंतरावर गँगमन मोहमद आदम अ.गनी यांनी लाल ङोंडी दाखवून गाडी थांबवली. कारण त्यांना या मार्गावरील खांब क्रमांक  444-445/29 जवळ मुख्य रेल्वे मार्गाला तडा गेल्याचे रात्रीची गस्त घालताना आढळून आले. त्यांनी ही बाब लागलीच आपले वरिष्ठ सिनिअर सेक्शन इंजिनिअर  गौरव सोनवणे व नितीन मेहता यांना कळवली.
त्या आधी त्यांनी नियंत्रणरक्षकाला ही माहिती कळवली. मात्र त्याचवेळी कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन ही एक्स्प्रेस गाडी येताना दिसली.त्यांनी प्रसंगावधान राखून लाल  ङोंडी दाखवून गाडी थांबवली. गँगमन मोहमद आदम यांच्याकडून थोडी जरी चूक असती तर अनर्थ झाला असता. मात्र त्यांच्याकडून सतर्कता दाखविण्यात आल्याने  अपघात टाळला आहे.