Breaking News

जत येथील कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

सांगली, दि. 01 - जत तालुक्यातील मुचंडी येथील काशिराम गणपत काटे (वय 58) या शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून घरासमोरील लिंबाच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मुचंडी गावचे पोलिस पाटील रोहित शिवशरण यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
काशिराम काटे यांची मुचंडी ते शेड्याळ रस्त्यावर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेतजमिन आहे. तेथे ते पत्नीसमवेत राहत होते. त्यांनी एक एकर जागेत  डाळिंब बाग लावली होती, तर उर्वरित जमिनीत खरिप हंगामाची पेरणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुचंडी विकास सोसायटीकडून डाळिंब बागेसाठी गतवर्षी 80 हजार  रूपयांचे कर्ज घेतले होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतंर्गत संपूर्ण कर्जमाफी केली, तर त्यांना 25 हजार रूपयांची सवलत मिळणार होती.
त्यासाठी त्यांनी पैशाची जुळवाजुळव सुरू केली होती. मात्र कोणाकडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने काशिराम काटे कमालीचे नैराश्यग्रस्त झाले होते. आता एका  दिवसात या कर्जाची कशी परतफेड करायची, याच विचारात ते होते. या नैराश्यातूनच त्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास  घेऊन आत्महत्या केली. काशिराम काटे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.