Breaking News

रॅम फिनिशर्सचे नाशिक शहरात जंगी स्वागत

नाशिक, दि. 01 - रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम या अत्यंत अवघडा जाणार्‍या सायकलिंग स्पर्धा पूर्ण केल्यानंतर टीम सह्याद्री आणि टीम श्रीनिवास यांचे काल  (दि. 29) सकाळी 7 वाजता नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात आले.
सकाळी मुंबई विमानतळावरून नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर लगेचच लेफ्टनंट कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ आणि टीम सह्याद्रीची चौकडीपैकी डॉ. राजेंद्र नेहेते  डॉ. रमाकांत पाटील आणि पंकज मारलेशा यांचे फेटा बांधून औक्षण करत भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. त्यानंतर चौघांची हत्तीवरून ढोल ताशाच्या  गजरात हॉटेल गारवा ते पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. टीम श्रीनि आणि टीम सह्याद्री यांच्या यशात  सहभागी असणारी टीमही या मिरवणूकीत सहभागी झाली होती. यावेळी 200 हून अधिक सायकलीस्ट उपस्थित होते.
सोलो प्रकारात रॅम पूर्ण करणारे पहिले भारतीय आणि आशियायी ठरलेले विक्रमवीर लेफ्टनंट कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ आणि टीम सह्याद्री यांनी जयघोष करत  पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. नाशिक शहरात एवढे भव्य स्वागत झाल्याचे बघून डॉ. श्रीनि भारावले होते.
अमेरिकेच्या पश्‍चिम टोकापासून पूर्वेकडील समुद्र किनार्‍यापर्यंतचा 3000 मैलाचा खडतर प्रवास सायकलवर करत ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांचा कस लागत  असतो. त्यात नाशिकच्या कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक (सोलो) गटात काल 11 दिवस 18 तास 45 मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. ते आपल्या  गटात सातव्या क्रमांकावर राहिले. तर टीम सह्याद्रीने रिले प्रकारात स्पर्धेत उतरताना 4 जणांच्या संघाने केवळ 8 दिवस 10 तास आणि 16 मिनिटात ही रेस पूर्ण  केली आहे.
स्वागत प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीनिवास म्हणाले की, स्वतःवर विश्‍वास ठेवल्यामुळेच मला रॅम पूर्ण करण्याचे स्वप्न बघता आले आहे. मागीलवर्षी 2016  मध्ये स्पर्धा पूर्ण करण्यास अपयश आल्यानंतर क्रु टीम मध्ये असणार्‍या माझ्या पत्नीने आधार दिल्यानेच मला पुन्हा एकदा उभे राहता आल्याची भावना डॉ. श्रीनिवास  यांनी व्यक्त केली.