Breaking News

उत्तर प्रदेशमध्ये दारूबंदी नाही - जय प्रताप सिंग

लखनौ, दि. 20, जुलै - गुजरात, बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये दारूबंदी लागू केली जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे उत्पादन शुल्क मंत्री जय प्रताप सिंग यांनी स्पष्ट  केले. उत्पादन शुल्क विभागातील महसूलाचा वापर जनहितासाठी व विकास कामांसाठी केला जातो. दारूबंदी केल्यास दारूच्या बेकायदा विक्रित वाढ होईल. लोक  अवैध मार्गांनी दारू खरेदी करतील. त्यामुळे महसूलाचा विचार करता व लोकहिताचा विचार करता उत्तर प्रदेशमध्ये दारूबंदी लागू करणे योग्य ठरणार नाही, असे जय  प्रताप सिंग यांनी विधानसभेत सांगितले . 
काँग्रेस सदस्य अजय कुमार लल्लू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सिंग यांनी ही माहिती दिली. संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना यावेळी म्हणाले की,  50 हून अधिक वर्षे कारभार केलेल्या काँग्रेस पक्षाकडून दारूबंदीची मागणी केली जात आहे, ही आश्‍चर्यजनक बाब आहे. दारूबंदीला विरोध नाही. मात्र, राज्यात  दारूबंदी लागू करणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.