Breaking News

पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर होणार कडक कारवाई : चंद्रकांतदादा पाटील

पंढरपूर, दि. 01 - ‘चंद्रभागेत अवैध वाळू उपसा करणार्‍यावर महसूल विभाग कडक कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम महसूल विभाग हाती घेत आहे. चंद्रभागा  नदीच्या पात्रामध्ये दोन्ही तीरांवर वारीच्या काळात दुर्घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने मदतीने सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत.  चंद्रभागा नदीच्या पात्रात 11 जून रोजी घडलेल्या दुर्घटनाग्रस्त मुलांच्या कुटुंबियांना खास बाब म्हणून शिफारस करून महसूल विभागाकडून शासनाकडून लवकरच  आर्थिक मदत देण्यात येईल. वारीच्या पूर्वतयारीच्या कामांची पाहणी करण्यासाठी 3 जुलै रोजी मी स्वतः पंढरपूर येथे भेट देणार आहे,’ अशी माहिती आज महसूल  मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज शिवसेना उपनेत्या आ. डॉ. नीलम गोर्‍हे यांना दिली.
29 जून रोजी डॉ. गोर्‍हे यांनी पंढरपूरला भेट देऊन पाहणी केली होती. यासंदर्भात पाहिलेल्या मुद्द्यांवर पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने त्यांनी आज महसूलमंत्र्यांची भेट  घेतली. यावेळी ही चर्चा झाली. आजवर पंढरपूर देवस्थानला विविध आमदारांनी दिलेला व शासनाकडूनही देण्यात आलेला सुमारे 250 कोटी रुपयांचा उपलब्ध  होऊनही पंढरपूर येथे भक्त निवास अजून का पूर्णत्वास आले नाही या व इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आणि  आळंदी येथील सिद्धबेट विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिका-यांसोबत आ. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार  आहे. आळंदी येथील शासकीय विश्रामगृह सध्या अपुरे पडत असल्याने येथे लवकरच नवीन विस्तारित कक्ष उभारण्याची डॉ. गोर्‍हे यांची मागणी त्यांनी त्वरीत मान्य  केली.
विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीच्या वरच्या बाजूला बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यानी पादत्राणे काढूनच थांबण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंदिरातर्फे  एकादशीच्या दिवशी भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडवाऐवजी राजगिरा लाडू देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दर्शन मंडपात तयार झालेले खड्डे बुजवून  दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. यावर्षीची आषाढी वारी दरवर्षी पेक्षा अधिक सुरक्षित आणि स्वच्छतापूर्ण होण्यासाठी प्रशासन सुसज्ज असून भाविकांच्या सुरक्षेवर  अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या देवस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांचा सन्मान आणि व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने आंध्र व  गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मंदिर व्यवस्थापनाचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार व्हावा या सूचनेवर नक्की विचार करू. राज्यातील सर्वच देवस्थानचे पुजारी,  मंदिरांचे व्यवस्थापन याविषयी राज्यभर एक समान सूत्र ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन मंत्र्यांनी आ. डॉ. गोर्‍हे यांना दिले. नमामि चंद्रभागा प्रकल्प  आणि आरोग्यासंदर्भात असलेल्या विविध समस्यांचा आढावाही घेतला जाईल असे ते म्हणाले.