Breaking News

सैराटच्या विहिरीत पडून नगरच्या वृद्ध वारकर्‍याचा मृत्यू

करमाळा, दि. 01 - सुमारे साडेतीनशे वर्षे जुन्या असलेल्या देवीचा माळ येथील ऐतिहासिक विहिरीत पडून अहमदनगरच्या वृद्ध वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना  घडली. मोहन नामदेव घोगळ (75, रा. रांजणगाव, ता. राहता, जि. नगर) असे मृताचे नाव असून ते एका डोळ्याने अंध होते. दरम्यान, ‘सैराट’ या चित्रपटातील  काही दृश्यांचे चित्रीकरण या विहिरीत करण्यात आले होते.
खंडोबाची वाकडी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथून 21 जून रोजी पंढरपूरकडे निघालेली 350 वारकर्‍यांची जय खंडेराय दिंडी अहमदनगरमार्गे येथील देवीचा माळ  येथे पोहोचली. येथेच पालखीचा मुक्काम होता. वारकरी घोगळ हे बॅटरी घेऊन प्रातर्विधीसाठी 96 पायर्‍यांच्या विहिरीच्या बाजूने निघाले होते. कठड्यावरून जाताना  बरोबर मधोमध आल्यानंतर अंधारात न दिसल्यामुळे ते पाय घसरून 50 फूट खोल विहिरीतील दगडी पायर्‍यांवर पडले. त्यांच्या डोक्याला व छातीच्या बरगडीला  जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इतर वारकर्‍यांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली.