Breaking News

महापौरांच्या विरोधात उपमहापौर छिंदम यांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर, दि. 21, जुलै - अहमदनगर महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून भाजपातील खा.दिलीप गांधी यांचा गट व सत्ताधारी शिवसेना यांच्यात सातत्याने  वेगवेगळ्या विषयांवरून वादंग होत आहेत.त्या दरम्यान महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदींची नोंद असलेले बजेट रजिस्टर महापौर सुरेखा कदम यांनी आपल्या  ताब्यात ठेवल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.महापौरांनी शहर अभियंता यांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत उप महापौर श्रीपाद छिंदम यांनी  शिवसेनेला निशाणा करीत सोमवार पासून (24 जुलै)मनपा आयुक्तांच्या दालनातच उपोषण करण्याचा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान मनपातील  विरोधी असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही उप महापौरांच्या मागणीला पाठिंबा देऊन सदरचे रजिस्टर शहर अभियंता यांच्याकडेच ठेवावे,अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकरिता स्वतंत्र स्वेच्छा निधीची तरतूद आहे.या संदर्भातील कामांची नोंद बजेट रजिस्टर मध्ये  ठेवली जाते.साधारणपणे हे रजिस्टर महापालिकेचे शहर अभियंता यांच्याकडेच असते.मात्र सध्या हे रजिस्टर महापौर सुरेखा कदम यांच्याकडे आहे.या विषयावरून  सध्या मनपात जोरदार वादंग निर्माण झाले आहे.कोणती कामे करायची याची निश्‍चिती आता महापौरांकडूनच केली जात असल्याने सत्ताधारी भाजपा व विरोधी  नगरसेवकांची कामे प्रलंबित आहेत.निधी उपलब्ध असूनही बजेट रजिस्टर मध्ये नोंद होत नसल्याने कामे अडकली आहेत.कामे करण्यात त्यामुळे मोठी अडचण निर्माण  होत असल्याने उप महापौर छिंदम चांगलेच क्रोधित झाले आहेत. सदरचे बजेट रजिस्टर तीन दिवसांत शहर अभियंता यांच्या ताब्यात दिले नाही तर सोमवार पासून  आयुक्तांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा छिंदम यांनी दिला आहे.या वादात उडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आयुक्तांना निवेदन दिले  आहे.राष्ट्रवादीने या निमित्ताने भाजपा-शिवसेनेतील वाद वाढतच ठेवण्याची राजकीय खेळी केली असल्याची चर्चा आहे.