Breaking News

वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 01 - महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत सांगली जल्ह्यात होणार्या रोप लागवड स्थळावर  लोकप्रतिनिधी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रोप लागवड होणार आहे. यामध्ये 1 जुलै 2017 रोजी जत तालुक्यातील कसबे जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील  आगळगाव येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख व जल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्या उपस्थितीत  जिल्हास्तरीय रोप लागवड कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ही माहिती वनविभाग सांगलीचे उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा यांनी दिली.
डॉ. भारत सिंह हाडा म्हणाले, 2 जुलै 2017 रोजी मिरज तालुक्यातील दंडोबा येथे सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व अन्य मान्यवरांच्या  उपस्थितीत रोप लागवड होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत रोप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सांगली  जिल्ह्यास 8 लाख 84 हजार इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई पूर्ण करण्यात आली आहे. सन 2017 च्या  पावसाळ्यात वृक्ष लागवडीकरिता जिल्हास्तरावर 6, तालुकास्तरावर 17, गावस्तरावर 86 बैठका घेण्यात आल्या. 1 मे 2017 रोजीच्या ग्रामसभेत 733 ठिकाणी  बैठका घेण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यात वन विभागास 4 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 64 हजार, ग्रामपंचायत 2 लाख 55 हजार व इतर यंत्रणांना 1  लाख 65 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाकडे 11 लाख 91 हजार तर सामाजिक वनीकरण विभागाकडे 9 लाख  6 हजार अशी एकूण 20 लाख 97 हजार इतकी रोपे तयार आहेत.
वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या संकेत स्थळावर 1 लाख 24 हजार 531 इतक्या सांगली जिल्हा हरित सेना सदस्यांची नोंदणी झाली आहे. लागवड झालेल्या  रोपांची नोंदणी, संरक्षण देखभाल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व  नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही डॉ. भारत सिंह हाडा यांनी केले आहे.