Breaking News

गॅस गळतीच्या अफवेने चालत्या रेल्वेतून मारल्या उड्या !

औरंगाबाद, दि. 01 - रेल्वेच्या पॅन्ट्री कारमधून स्वयंपाकाच्या गॅसची गळती होत असून स्फोट होण्याची शक्यता आहे अशी अफवा उठल्याने आज सकाळी रेल्वेतून  प्रवाशांनी घाबरून उड्या मारण्याची घटना बदनापूर ते करमाड या दोन रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. प्रसंगावधान राखून कोणीतरी साखळी ओढल्याने गाडीचा वेग  कमी होवून मोठा अनर्थ टळला. धर्माबादहून मनमाडकडे सकाळच्या वेळी धावणार्‍या मराठवाडा एक्सप्रेस किंवा हायकोर्ट एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. रोजच्या  वेळेनुसार या गाडीने सकाळी 9 वाजता जालना स्टेशनसोडून औरंगाबादच्या दिशेने धाव घेतली. या गाडीने बदनापूर स्टेशन सोडून करमाडकडे धाव घेतली तेव्हा  गाडीत पॅण्ट्रीकारमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची गळती होत असल्याची अफवा गाडीत वेगाने पसरली. आत गॅसचा स्फोट होवून आग लागेल या भीतीने काही प्रवासी  धावत्या गाडीतून उड्या घेवू लागले. त्यामुळे काही किरकोळ जखमीही झाले. हे चालू असताना प्रसंगावधान राखून कोणीतरी गाडीची साखळी ओढल्याने गाडी थांबली  आणि पुढील अनर्थ टळला. धावत्या गाडीतून घाबरून उड्या टाकल्याने मोठ्या प्रमाणात जखमी होण्याची किंवा प्राण गमावण्याचीही भीती होती. नंतर गाडीत गॅस  सिलिंडरच नाही त्यामुळे गळतीचा प्रश्‍नच नसून ती अफवा होती ही माहिती गाडीत सर्वत्र सांगण्यात आली आणि सर्व प्रवाशांना घेवून गाडी पुढे औरंगाबादकडे मार्गस्थ  झाली. विशेष म्हणजे या घटनेची पुसटशीही माहिती विभागीय कार्यालय नांदेड येथील अधिकार्‍यांना नव्हती.