Breaking News

बुलडाणा जिल्ह्यात 8.52 लाख वृक्षांची होणार लागवड!

बुलडाणा, दि. 01 - जिल्ह्यात 1 जुलैपासून 4 कोटी वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून, प्रशासनाचे विविध विभाग या योजनेत सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात यावर्षी 8 लाख 52 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
राज्यात 50 कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 4 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी 8.52 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील 859 ग्रामपंचायतींना 3.15 लाख इतके देण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणार्‍या 859 ग्रामपंचायतींनी पर्यावरण उपयुक्त झाडे लावण्यात येणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात ज्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे त्यामध्ये जीवनदायी वृक्ष-वड, उंबर, पाखर, नांदूक, पिंपळ. फळ झाडे -बोर, चिंच, आवळा, मोहा, टेभुर्णी, जांभूळ, नारळ, शिवण, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा. मंदिराभोवती लावण्यास योग्य -पिंपळ, बेल, शमी, आपटा, चाफा, कडुलिंब. रस्त्याच्या कडेला लावण्यास योग्य-कडुलिंब, सप्तपर्णी, करंजी, पिंपळ, चिंच, शिसव. शेताच्या बांधावर उपयुक्त-शिंदी, ताडफळ, बांबू, शेवगा, तुळस, कढीलिंब. शेताच्या कुंपणासाठी उपयुक्त-सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी, घायपात, एरंड. सरपणासाठी उपयुक्त-देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू. औषधी उपयुक्त-हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुलिंब, करंज, रिठा, निरगुडी, सिवन. वनशेतीसाठी उपयुक्त- आवळा, अंजीर, फणस, चिंच, सिरणी, सिंदी, तुती, करवंद. शेत जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयुक्त-उंबर, करंज, शेवरी. घराभोवती उपयुक्त-चंदन, रक्तचंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल. बारा तासापेक्षा जास्त प्राणवायू देणारी उपयुक्त-वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, कदंब. औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण निवारणार्थ उपयुक्त-पिंपळ, पेल्टोफेरम, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सीताफळ, सप्तपर्णी, पेरू, बोर, कडूलिंब, आवळा चिंच, कदंब, बेल. धुळीकण व विषारी वायू निवारणार्थ उपयुक्त-आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री, जास्वंद, पारिजात, राजराणी, मेहंदी, तुळस. हवामान स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त-पळस, सावर, कदंब, गुलमोहर. हवेतील प्रदूषण दर्शवण्याठी उपयुक्त-हळद, पळस, चारोळी. रस्त्याच्या मध्यभागी लावण्याठी उपयुक्त-कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्‍वगंधा व निवडुंग या झाडांचा समावेश आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कालावधी 1 ते 7 जुलै 2017 राहणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी 1 ते 7 जुलै 2018 राहणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी 1 ते 7 जुलै 2019 राहणार आहे.