Breaking News

वाकी धरण ओव्हरफ्लो; भंडारदर्‍यात 598 दलघफू नवीन पाण्याची आवक

धरण परिसरात पावसाचा जोर कायम

अकोले, दि. 01 - तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणंलोट क्षेत्रात ही पावसाचा जोर कायम आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे 24 तासात 9 इंच तर घाटघरला 8 इंच पाऊस पडला. तालुक्यातील 112 दलघफु क्षमतेचा वाकी लघु तलाव ही कालच्या पावसात भरला आहे. वाकी धरणातून ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून 197 क्यूसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे.
मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव भरुन ओसांडून वाहू लागल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव खांड लघु तलाव भरल्याने आता हे पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.
दोन दिवसांपासून कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड पट्टयात मान्सून पुन्हा सक्रीय झाला. कालपासून सह्याद्रीच्या डोंगररांगात पावसाच्या जोरदार सरींची बरसात सुरु आहे. आज सकाळपर्यंत 24 तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - भंडारदरा 149, रतनवाडी 227, घाटघर 205, पांजरे 136, वाकी 103.
काल दिवसभरही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा तांडव जोरदार सुरुच होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडत असणार्‍या पावसामुळे या परिसरातील ओढे नाले आता जोमाने वाहू लागले आहे.
त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठयातही चांगली वाढ होत आहे. सकाळपर्यंतच्या 30 तासात भंडारदरा धरणात 360 दलघफू पाण्याची आवक झाली. सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 3 हजार 25 दलघफू झाला होता.
मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्‍चंद्र परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव भरल्याने नदी ओसंडून वाहू लागली आहे. 600 दलघफू क्षमतेच्या या तलावात 500 दलघफू पाणीसाठा करण्यात आला आहे. पिंपळगाव खांड तलाव भरल्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळेचे पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे.
मुळा नदी वाहती झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पिंपळगाव खांड धरणाच्या भिंतीवरुन 2 हजार क्यूसेक विसर्ग सुरु होता. पावसाचा जोर सलग सुरु असल्याने शेती कामे खोळंबली आहेत. पावसाने उघडीप दिल्यास शेती कामांना वेग येईल.