Breaking News

लासलगाव बाजार समितीत 50 हजार क्रेटस् डाळींब आवक

लासलगाव, दि. 21, जुलै - कांदा ही मुख्य ओळख लासलगाव या गावाची आहे. मा याच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींबाची मोठी आवक येत आहे. येथील बाजार समिती हे अल्पावधीत कांद्यापाठोपाठ डाळींब विक्रीसाठी नावारूपास येत असून आता येथून दररोज देशातर्गत दिल्ली, उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश,  बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणत डाळिंब जात आहे. याचा फायदा येथील शेतकर्‍यांना होत असून डाळींबाच्या भावात जुलै नंतर आवक वाढल्यानंतर हि 450  रुपयांची वाढ झाली आहे . दररोज 3 ते 4 हजार क्रेटस् ची आवक होत आहे. जास्तीत जास्त 1500, सरासरी 1050 तर कमीत कमी 100 रुपये 20 किलो च्या  प्रती क्रेटस् ला भाव मिळत आहे.
लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये  शेतक-यांनी डाळींब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. यंदा पाऊस वेळेवर आल्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिसरातील  शेतक-यांना डाळींब विक्रीसाठी जवळ व्यवस्था निर्माण व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीने गेल्या तीन वर्षापासुन डाळींब लिलाव सुरू केले असुन त्यास शेतकरी  व व्यापारी वर्गाकडुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चालु हंगामातील डाळींब लिलाव 10 एप्रिल पासून सुरु करण्यात आले आहे .तेव्हापासून पासून ते आता  पर्यंत 50 हजार डाळिंब क्रेटसची आवक झाली आहे . सन 2015 मध्ये 95 हजार क्रेटस् आवक झाली. मागील वर्षी सन 2016 मध्ये 1 लाख 65 क्रेटस् ची आवक  झाली होती. डाळींब उत्पादक शेतक-यांना वजनमापानंतर लगेच रोख चुकवती केली जात असल्याने डाळींब उत्पादकांची डाळींब विक्रीसाठी मोठी गर्दी येत आहे. या  हंगामात 5 ते 6 लाख क्रेटस् च्या जवळपास डाळींबाची आवक होण्याची शक्यता बाजार समितीच्या सभापतींनी व्यक्त केली आहे .
शेतकरी बांधवांनी डाळींब आणतंना 20 किलोच्या क्रेटस्मध्ये एकसारखा माल प्रतवारी करून विक्रीस आणल्यास व्यापारी वर्गाकडुन त्यास चांगले बाजारभाव मिळत  आहे ,तसेच वजनमापाचे वेळी किडका, रंगहीन म्हणुन वांधे पडणार नाही. रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत अथवा  आवक संपेपर्यंत डाळींब लिलाव सुरु आहे.