Breaking News

पाच आमदार एनडीएच्या राष्ट्रपती उमेदवाराचे अनुमोदक

पुणे, दि. 21 - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या उमेदवारी अर्जावर  महाराष्ट्रातील भाजपच्या 25 आमदारांनी आज सूचक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या. पुण्यातील 5 आमदारांचा यात समावेश होता.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पुढील 23 जून रोजी कोविंद हे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अर्जावर  अनुमोदक म्हणून 50 आमदार किंवा खासदार आणि सूचक म्हणूनही तितक्याच संख्येने आमदार किंवा खासदार सूचक म्हणून आवश्यक असतात. म्हणजे एका  अर्जावर शंभर जणांच्या स्वाक्षर्‍या आवश्यक असतात. भाजपकडून 4 अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांना आज  दिल्लीत बोलविण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी सहप्रभारी राकेशसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन या अर्जावर सह्या केल्या.
पुण्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश लांडगे, आमदार बाळ भेगडे, भीमराव तापकीर आणि विजय काळे हे पाच जण गेले होते. राज्याच्या इतर भागातूनही आमदार  आले होते. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गट भाजपने या निवडणुकीसाठी सक्रिय केला आहे. यात राज्यमंत्री मुक्तार अब्बास  नक्वी आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे.