Breaking News

मेट्रो लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील - रामनाथ सुब्रमण्यम

पुणे, दि. 21 - पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना मेट्रो प्रकल्पाची माहिती व्हावी, यासाठी ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्यासह  पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेली मेट्रो ही जागतिक दर्जाची करण्याबरोबरच नागरिकांसाठी सुसह्य, पर्यावरणपूरक आणि शहराचा ऐतिहासिक वासरा प्रतिबिंबीत  करणारी असेल आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी  सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना मेट्रो प्रकल्पाची माहिती व्हावी. त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने ‘मेट्रो संवाद’चे  आयोजन करण्यात आले होते. महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर नितीन काळजे,  उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साबळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, भाजप पक्षनेते एकनाथ पवार, पुणे मेट्रोचे प्रकाश कदम, श्रीनिवास  कुलकर्णी यांबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.
रामनाथ सुब्रमण्यम म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका ते शिवाजीनगर असा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. यापैकी 6 स्टेशन्स ही पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या हद्दीत येणार आहेत. या मार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून, येत्या काळात वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबरोबरच  भविष्यात मेट्रो प्रकल्प हा पर्यावरणपूरक करण्यासाठीदेखील आम्ही पावले उचलीत आहोत. एका झाडामागे 10 झाडे लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पुणे आणि  पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा ऐतिहासिक वारसा मेट्रोच्या निमित्ताने सर्वांसमोर आणण्यासाठी मेट्रो स्टेशन्स आणि मेट्रो अंतर्गत सजावट ही या ऐतिहासिक  पार्श्‍वभूमीवर असेल, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
याबरोबरच पुणे मेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर या दुसर्‍या टप्प्याचे काम हे जून महिनाअखेरीस सुरू होईल, अशी माहिती यावेळी शशिकांत लिमये यांनी दिली. मेट्रोचे  काम सुरू झाल्यानंतर केवळ काही फुटांवर कठीण खडक लागल्यामुळे पाया खोदण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होईल, असा अंदाज असल्याचेही  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.