Breaking News

मान्सूनचे आगमन लांबणीवर, उकाड्याने नागरिक त्रस्त

पालघर, दि. 21 - पूर्व मान्सून च्या पाठोपाठ मान्सून वेळेत दाखल होण्याचे स्वप्न भंग पावल्याने शेतीची काम खोळंबली आहेत. मात्र बाष्पीकरणामुळे तसेच हवेतील  आद्रता वाढल्याने उकाड्याच्या त्रासामुळे पालघर तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. 
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व सरींनी पालघर तालुक्यातील विविध परिसर अक्षरशः भिजवून टाकला होता. त्याच्या पाठोपाठ मान्सून दाखल होण्याचे  संकेत वेधशाळेतून व्यक्त करण्यात आले होते. मात्र मान्सून कर्नाटक केरळमध्ये थांबून राहिल्याने शेतीची कामे मंदावली. पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील अनेक  शेतकरी हे पेरणी व लावणी पद्धतीएवजी रोऊ पद्धतीने भात लागवड करतात. रोऊ पद्धतीने लागवड केलेला भात आता जमिनीच्या वर दिसू लागला असून या पिकला  आता पाण्याची गरज भासणार आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून वारंवार ऋतू बदल होत असल्याने अनेक ठिकाणी व्हायरल (विषाणू) आजारांचे प्रमाण वाढले आहे.  तसेच हवेतील आद्र्तेमध्ये झालेल्या वाढीसोबत दिवसाचे तापमान वाढत चालल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. येत्या आठवड्यात मान्सून मुंबई व उत्तर  कोकणात दाखल होण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असून तालुक्यातील नागरिक व शेतकरी मान्सूनच्या अगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.