Breaking News

विस्तारीत पाणी पुरवठा योजनेचे काम ठप्प

ना. सौ. विखे यांना आश्‍वी खुर्दचे ग्रामस्थ देणार निवेदन

संगमनेर, दि. 24 - तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील नविन विस्तारीत पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपनामुळे अपूर्णच राहिले असून या योजनेचे काम ठप्प आहे. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे यांना निवेदन देवून त्यांचे लक्ष ग्रामस्थ वेधणार आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांच्या विशेष प्रयत्नातून आश्‍वी खुर्द गावासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून जवळपास दीड कोटी रुपये किंमतीची योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेद्वारे गावासाठी 85 हजार लिटर पाणी क्षमता असलेली पाण्याची टाकी वाड्यांवस्त्यांसाठी विस्तारीत स्वरुपाची पाईपलाईन व इतर कामांचा आराखडा तयार करण्यात आला. 25 जुन 2014 रोजी उद्घाटन होवून एका वर्षात काम पूर्ण करण्याचा ठेका येथील ज्योती कंन्ट्रक्शनचे ठेकेदार व्ही. एम. चाटे यांना देण्यात आला. परंतु चाटे यांनी तीन वर्षात केवळ 70 टक्के काम केले असून उर्वरीत 30 टक्के काम अपूर्णच ठेवले असून या कामापोटी 1 कोटी 93 लाख 754 रुपये बिले मंजूर करुन घेतली आहे.
दरम्यान हभप वसंतराव वर्पे यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी एक गुंठा जागा ग्रामपंचायतीला देवू केली. त्या जागेवर बाधण्यात आलेल्या 85 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत मागील तीन वर्षात पाण्याचा एक थेंबही पडला नाही. तर टाकीच्या बांधकामाचे साहित्य वर्पे यांच्या 20 गुंठ्यात पडून असल्याने शेती करण्यास त्यांना अडथळे निर्माण होत असल्याने ती पडीतच आहे. परिसरातील विस्तारीत पाईपलाईन, वॉल, पंप हाऊस, विहीर दुरुस्ती, नविन विज पंप, बोर्ड हाऊस, रस्त्याच्या व प्रवरा उजव्या कालव्यातून जाणार्‍या पाईप लाईन, चेंबरची कामे अपूर्ण स्थिती आहे. विहीर ते टाकी ही अति महत्वाची पाईप लाईन देखील या ठेकेदाराने टाकलेली नाही. गावातील दलितवस्ती, आदिवासीवस्ती, शिंदे वस्ती, स्मशानभूमी परिसरासह काम ठप्प अवस्थेत आहे.
या महत्वकांक्षी योजनेचे काम रखडल्याने वाडीवस्तीवरील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे. एका वर्षाच्या कामाला तीन वर्षाचा कालावधी होवूनही काम अपूर्णच असल्याने ठेकेदाराविरोधीत संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदारा चाटेवर कारवाई करावो, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांना देणार आहेत.