Breaking News

संगमनेरात आदिवासी समाज एकवटला, अर्धा तास रास्तारोको

अल्पवयीन आदिवासी मुलगी अत्याचार प्रकरण

संगमनेर, दि. 24 - आदिवासी ठाकर समाजाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील खांबा येथे घडली होती. या पार्श्‍वभूमीवर आरोपींना कठोर शासन व्हावे, घटनेतील इतर चौघा आरोपींना तात्काळ अटक करावी या व इतर मागण्यांसाठी काल शुक्रवारी सकाळी शहरातील बसस्थानकासमोर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होवून दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी आदिवासी समाज एकटला असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन यात सहभागी असलेल्या महिलेने तिचा छळ केला. 10 वीची परीक्षा देवून सुटट्यांसाठी ती मामाच्या गावाला खांबा येथे आली होती. या घटनेला महिना होत आला तरी आरोपी अद्याप फरारच आहेत. मुख्य सुत्रधार अमोल संपत शिंदे व त्याची आई कांताबाई शिंदे यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांना 25 जुनपर्यंत पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली आहे. परंतु यात सहभागी असलेले इतर चौघांनाही अटक करा, दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा करा, पिडीत मुलीच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्या, त्यांचे पुर्नवसन करा, आश्‍वीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी दखल न घेतल्याने त्यांना निलंबीत करा आदी मागण्यांसाठी काल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला.
पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना शासन झालेच पाहिजे, आदिवासी एकजुटीचा विजय असो,   आंदोलकांनी अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. उपस्थित कार्यकर्त्यांनी भाषणातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे  राजाध्यक्ष लकीभाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष रोहिदास कौटे, उपाध्यक्ष कुंडलिक काळे, लहुजी सेनेचे मंजाबापू साळवे, मारुती केदार, दिपक मरभळ, श्रीकांत कौटे, निलेश घाणे, निवृत्ती घोडे, रामनाथ मधे, सुधाकर मेंगाळ, दशरथ भुतांबरे, एकनाथ कडाळे, मच्छिंद्र रावते, राजू साखळे, अनिल जाधव, रामनाथ केदार आदी उपस्थित होते. अर्धा तास सुरु असलेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी पोलीस प्रशासनाला आंदोलकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलना दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला होता.