Breaking News

सदाभाऊंनी शेतकर्‍यांशी बेईमानी केली - दशरथ सावंत


अकोले, दि. 06 - शेतकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीपद उपभोगणारे मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकर्‍यांच्या संपात फुट पाडून शेतकर्‍यांशी बेईमानी केली असून येत्या निवडणूकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी बोचरी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी काल शेतकरी संपाच्या समर्थनात इंदोरी फाटयावरील रास्तारोकोत केली. यावेळी सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून पुतळयाचे दहन करण्यात आले.
शेतकरी संपात सहभागी असलेल्या इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, बागायती पट्टयातील शेतकर्‍यांनी सरकारच्या संपात फुट पाडण्याच्या निषेधार्थ एकत्र येत रुंभोडी ते इंदोरी फाटा अशी सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली.
यानिमित्ताने इंदोरी फाटयावर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला व सरकारच्या पुतळयाचे दहन करीत असताना आंदोलक शेतकरी व पोलीसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही शेतकर्‍यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडनही केले.
यावेळी श्री. सावंत म्हणाले की, शेतकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीपद उपभोगणारे मंत्री सदभाऊ खोत यांनी शेतकर्‍यांची भूमिका घेवून योग्य तो न्याय देण्याऐवजी संपात फुट कशी पडेल याचे डावपेच आखले. व संप जाणीवपुर्वक फोडला. शेतकर्‍यांशी इनामदारीने वागण्यापेक्षा सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याने त्यांनी शेतकर्‍यांशी हरामखोरीकरुन बेईमानी दाखविली आहे. येत्या निवडणुकीत सर्व शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.  कामगारांचे पगार संपाचा इशारा देताच सरकार वाढवतील. मात्र शेतकर्‍यांच्या संपाचा गांभिर्यपुर्वक विचार होण्याऐवजी संपात फुटीचे डावपेच मुख्यमंत्र्यांनी रचले त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवावर सत्ता मिळविलेले भाजपा सत्कार हे लबाडांचे आहे.
सदाभाऊंबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्याकडे निषेध नोंदविला असून पक्षाने लवकर त्याची दखल न घेतल्यास सर्व सामान्य शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दूर जाईल असा इशारा त्यांनी दिला. तूर खरेदी म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे उपकार नाही. सत्तेत येण्याअगोदर स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्‍वासन या सरकारने दिले होते. मात्र ते आता विसरले आहे.
आमदारांचा पगार व भत्ते दुप्पट करताना सरकारला अभ्यासाची गरज नव्हती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या निवडणूकीत देवेंद्र व दानवेंद्र यांना शेतकरी धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद देशमुख म्हणाले की, जिरायती व बागायती असा भेदभाव करुन शेतकर्‍यांमध्ये सरकारने फुट पाडू नये संपुर्ण कर्जमाफी व स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात. तर देवेंद्र फडणवीस ढ विद्यार्थी असून त्यांना अभ्यास करता येत नसल्याने येत्या निवडणूकीत ते नापास होणार असल्याचे रिपाईचे शांताराम संगारे यांनी सांगितले.
प्रसिध्दी माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरल्याने संपास मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकर्‍यांना भिक नको, आधारभूत किंमत देण्याची मागणी आबा हासे यांनी केली.
यावेळी मनोहर मालुंजकर, बबन नवले यांची भाषणे झाली.   अखेरच्या टप्प्यात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यास पोलीसांनी मनाई केल्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी पुतळा दहन केला. यावेळी आंदोलनकर्ते व पोलीसांमध्ये चांगलीच शब्दिक चकमक व रेटारेटी झाली. यावेळी शेतकरी एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. रस्तारोकोमुळे मोठया प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
अमृतसागरचे संचालक गोरक्ष मालुंजकर, प्रकाश मालुंजकर, भाऊराव थोरात, रुंभोडीच उपसरपंच बाळू मालुंजकर, दगडू देशमुख, सिताराम नवले, सुभाष येवले, आबा हासे, रुंभोडी सेवा संस्थेचे संचालक अतुल लोहटे, संतोष लोहटे, आप्पा हासे, इंदोरी सेवा संस्थेचे सदस्य संदिप नवले, ग्रा. पं. सदस्य भाऊराव सावंत, किशोर काळे, पो. पा. गोरक्ष शिंदे, अशोक नवले, इंदोरीचे सरपंच संतोष नवले, कांदा व्यापारी अन्सार शेख यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पो नि. अशोक शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन बेंद्र, पोहेकॉ निलेश कोळपकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.