Breaking News

वारक-यांच्या सेवेकरीता चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि तीन टँकर

पुणे, दि. 21 - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि तीन  टँकर पुण्यातून रवाना झाले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून यंदा ट्रस्टच्या 125 व्या वर्षानिमित्त मोठया प्रमाणात डॉक्टर्स,  औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे  गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, बाळासाहेब  सातपुते, ज्ञानेश्‍वर रासने, विश्‍वास पलुसकर, विजय चव्हाण, बाळासाहेब रायकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 31 वे वर्ष आहे. रुग्णसेवेकरीता  रुग्णवाहिकेसोबत डॉ.स्वाती टिकेकर, डॉ.सुरेश जैन, डॉ.बबन राऊत, डॉ.प्रविण भोई, डॉ.शांताराम पोतदार, डॉ.दिलीप सातव, डॉ.पीयुष पुरोहित यांची टिम पुण्यातून  रवाना झाली आहे. सुनील रासने म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम  महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत,  आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.