Breaking News

दरड काढण्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दहा दिवस

पुणे, दि. 30 - खोपोली एक्झिटनजीक मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर दोन्ही बाजूकडील धोकादायक दरड काढण्याचे काम मागील तीन दिवसांपासून सुरु आहे. दरड  काढण्याचेक काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दहा दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील खोपोली एक्झिट नजीक  असलेल्या डोंगरातील धोकादायक दरड काढण्याचे काम सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या उंच डोंगरावर अनेक ठिकाणी धोकादायक दरड  असल्याने महामार्गावरून जाणा-या वाहनांना या दरडीचा धोका होऊ नये यासाठी या दरडी काढण्याचे काम करण्यात येत आहे.एक्सप्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात  वाहतूक होत असून या मार्गावर थोडा जरी अडथळा आला तरी तासंतास वाहने रस्त्यावर उभी राहतात. रस्त्यावर थांबलेली वाहने हटविता हटविता महामार्ग  पोलिसांच्या नाकी नऊ येतात. पोलिसांचा त्रास व वाहनांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम केले जात असून काम पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दहा दिवस तर जास्तीत  जास्त पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे.