Breaking News

साहित्य परिषदेत रसिकांनी घेतला शब्द पावसाचा चिंब करणारा अनुभव

पुणे, दि. 27 - बालपणापासून आपल्याला पाऊस कसाकसा भेटतो याचे सुरेख वर्णन करीत एकापाठोपाठ एक पाऊस-कवितांची बरसात झाली आणि शब्दांच्या  पावसाचा चिंब करून टाकणारा अनुभव रसिकांनी घेतला निमित्त होते महाकवी कालिदास दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने माधवराव पटवर्धन सभागृहात  आयोजित केलेल्या शब्दांचा पाऊस या गाजलेल्या मराठी पाऊस कवितांच्या मैफलिचे डॉ माधव मुतालिक आणि डॉ मैत्रेयी मुतालिक यांनी ही मैफल रंगवली. या वेळी  मसापचे कार्याध्या. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला  श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाकवी कालिदासाच्या मेघदूतातील अजरामर श्‍लोकापासून ते बालकवी, बोरकर, मर्ढेकर, गदिमा, केशवसुत, इंदिरा संत, अनिल, कृ. ब. निकुंब, बहिणाबाई, ना.  धों. महानोर, कुसुमाग्रज, वसंत निनावे, ग्रेस, शांता शेळके, अरुणा ढेरे यांच्या आणि अनेक पावसाच्या कवितांनी लहानपणच्या आठवणी जाग्या केल्या. डॉ माधव  मुतालिक यांच्या प्रभावी संहितेने या सर्व कवितांना एका विशिष्ट सूत्रात गुंफले होते. डॉ माधव मुतालिक आणि डॉ मैत्रेयी मुतालिक या दोघांनी कधी आलटून पालटून  तर कधी दोघांनी मिळून अत्यंत नाविन्यपूर्ण ढंगात कवितांचा अर्थ उलगडत उलगडत प्रभावी अभिवाचन केले. दोघांची सुंदर शब्दफेक, आवाजावरील आणि भाषेवरील  प्रभुत्व, आणि अचूक समन्वय यामुळे ही मैफल उत्तरोत्तर खुलत गेली.
पावसामुळे निसर्गामध्ये दिसणारी विविध मनोरम दृश्ये, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा आकांत इत्यादी विविध वर्णनांनी श्रोत्यांसमोर आषाढ - श्रावण  हुबेहूब उभे राहिले. ही मैफल म्हणजे मराठी काव्यसृष्टीतील पावसाच्या थेंबांचा मनोरम पाठलाग होता.
पहिला पाउस माझ्यासाठी नवाच असतो आणि कधी कधी पाऊस म्हणजे डोळ्यांमधले पाणी असतो, या डॉ माधव मुतालिक यांनी स्वतः लिहिलेल्या कवितांना  श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. आवाजातील चढउतार व नाट्य, आणि शब्दांमधील सूर, लय, ताल, नाद यांचे एक उत्कृष्ट सादरीकरण रसिकांना अनुभवायला  मिळाले. सव्वा तासाच्या या कार्यक्रमात पाऊस-कवितांचे विविध रंग डॉ माधव मुतालिक आणि डॉ मैत्रेयी मुतालिक यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने उलगडून  दाखवले. हा कार्यक्रम म्हणजे पाऊस कवितांची एक पर्वणीच ठरली.