वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा!
शिवसंग्राम संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा
बुलडाणा, दि. 10 - देऊळगाव राजा येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री साखर झोपेत असताना काही कारण नसतानाही शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. नुकतेच राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या थाटात 132 के.व्ही.चे उद्घाटन केले. याचा देऊळगाव राजा शहराला व परिसरातील वीज ग्राहकांना काय फायदा झाला? असा संतप्त सवाल शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला केला आहे.वीज दुरुस्तीचे काम नियोजन न करता वेळी अवेळी दुरुस्तीचे कामे करुन वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. अचानक अवेळी वीज पुरवठा खंडित होत असून शहरातील वीजेवर अवलंबून असणार्या व्यवसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्तीच्या कामाचे नियोजन अद्यापही नसल्याने वादळ व अल्प पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित होत असून पावसाळा सुरु होताच वीज पुरवठा यंत्रणेचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे. तसेच ट्री कटिंग, ट्रान्स फार्मर रिप्लेसमेंट अशी अनेक कामे नियोजन आधीच करण्याची गरज असताना अधिकारी मात्र बिनधास्त दिसत आहे. त्यामुळे वेळीच दुरुस्तीचे कामे निघत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. तसेच परिसरातील शेतकरी वीज सुरळीत नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे.
शिवसंग्राम संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील व परिसरातील वारंवार होणार विजेचा लपंडाव तात्काळ थाबवून योग्य ती उपाय योजना करावी व वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहिर खान पठाण, संभाजी नंनवरे, बालाजी खांडेभराड, नासेर मिर्झा, विनायक अनपट, रामेस्वर जाधव आदीच्या स्वाक्षर्या आहेत.
