माणसांपेक्षा जनावरांना श्रेष्ठ समजणार्या सनातन प्रवृत्तीचे लोक दलितांवर अन्याय करतात : चंद्रप्रकाश देगलूरकर
सामाजिक ऐक्य कृती समिती स्थापन करुन संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा काढणार!
बुलडाणा, दि. 10 - माणसांपेक्षा जनावरांना श्रेष्ठ समजणार्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांमुळेच दलित समाजावर अन्याय होतात, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुईखेड मायंबा व कोयाळी येथील कुटुंबियांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनादरम्यान केले.रुईखेड मायंबा येथील चर्मकार महिला राधाबाई उंबरकर व रविंद्र उंबरकर यांना गावातील 40 ते 50 नराधमांनी बेदम मारहाण करुन जातीय द्वेषातून विवस्त्र करुन गावातून धिंड काढली. तसेच कोयाळी दहातोंडे येथील महादेव त्र्यंबके, मधुकर त्र्यंबके, शिवाजी त्र्यंबके, संदीप त्र्यंबके यांना जातीयवादी मुरलीधर दहातोंडे, राजेश्वर दहातोंडे, भगवान दहातोंडे यांच्यासह 15 ते 20 लोकांनी बेदम मारहाण केली होती. या दोन्ही घटना एकाच आठवड्यातील असून केवळ जातीय द्वेषातून चर्मकार समाजावरच अन्याय होत आहे म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर निषेध आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनादरम्यान चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सदर पीडित कुटुंबाचे शहरात घर देवून पुनर्वसन करण्यात यावे, पोलिस संरक्षण देवून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नीच कृतीचा निषेध करुन कुणीही एकट्याने श्रेय न घेता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व समाजातील संघटनांनी एकत्र येवून आंदोलन उभारावे. सनातनी व जातीयवादी पक्ष संघटनांपासून चर्मकार समाजाने दूर राहावे असा सल्लाही देगलूरकर यांनी दिला. तर यावेळी माजी आमदार बाबुराव माने यांनी जातीयवादी पक्षाशी निगडीत असलेल्या संघटनांमध्ये काम करणार्या निवडून आलेल्या आमदार,खासदारांनी तसेच माजी मंत्र्यांनी सदर घटनेची कोणतीही दखल घेतली नाही म्हणून खंत व्यक्त केली व आता चर्मकार समाज ऐक्याची सुरुवात बुलडाण्यातून करुन ज्या ज्या संघटना सोबत येतील, त्यांना सोबत घेवून महाराष्ट्रभर आक्रोश मोर्चाचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली. या धरणे आंदोलनात अहमदनगर येथे कार्यरत असलेली चर्मकार उठाव संघ व राष्ट्रीय चर्मकार संघाने पाठिंबा दिला. तर यावेळी सदर पीडित कुटुंबियांवर झालेल्या आंदोलनाचा पाढाच चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे वाचून दाखवला. कोयाळी व रुईखेड येथील चर्मकार कुटुंबांचा छळ करणार्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सहारणपूर येथील चर्मकारांची हत्या व महिलांवर बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा द्यावी, लखनौ येथील कांशीराम स्मारकाला आग लावणार्या योगी सरकारला बरखास्त करण्यात यावे, रुईखेड मायंबा व कोयाळी येथील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील हे सर्व पदे रद्द करण्यात यावे, चर्मकार कुटुंबांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली. तर यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मणराव घुमरे, माजी आमदार बाबुराव माने, के.एम.वैरी, जिल्हाध्यक्ष शरद खरात, इंजि. शिवाजी जोहरे, संतोष खरुळे, प्रकाश डोंगरे, सचिन चंद्रे, समाधान चिंचोले, अरुण इंगळे, रामलाल चंद्रे, किरणकुमार चिंचोले, महादेव त्र्यंबके, निलेश हिवाळे, रामलाल खनसरे, विनोद खुर्दे, संतोष खरुळे, गौतम सातपुते, विनोद पवार, चर्मकार उठाव संघाचे संस्थापक काशिराम घासे, धोंडीराम लष्करे, शंकर मलवा, विनोद खरे, विनोद पवार, अनंता मिसाळ, जालंधर इंगळे बारा बलुतेदार संघटनेचे मुख्य प्रवर्तक दामोदर बिडवे, गजानन दसरकर, सरपंच बुद्धेश्वर हिवाळे, अशोक सुरडकर आदींची उपस्थिती होती.
