Breaking News

जिल्हा बँकेत नव्याने कर्मचारी भरती होणार- वाघ

संगमनेर, दि. 01 - जिल्ह्याची आर्थिक कामधेनू असलेल्या अ.नगर जिल्हा सहकारी बॅकेत नव्याने 470 कर्मचार्‍यांची भरती होणार असल्याची माहिती बॅकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी दिली.
संगमनेर येथे जिल्हा बँकेतील कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ दिल्याबद्दल काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.  व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शिवाजीराव थोरात, सभापती अजय फटांगरे, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी श्रीकांत गिरी आदीं मान्यवर उपस्थित होते.
रामदास वाघ म्हणाले, जिल्हा बॅकेने कायम शेतकर्‍यांची आस्था जपली आहे. मागील 5 ते 7 वर्षापासून बॅकेत कोणतीही कर्मचारी भरती झाली नाही. जिल्हा बॅकेच्या 296 शाखा कार्यरत असून 1320 कर्मचारी कार्यरत आहेत. बॅकेच्या कामाचा आवाकाही फार मोठा आहे. अगदी कमी कर्मचारी असतांनाही बॅकेने आपली गुणवत्ता व लौकिक राखत कायम अ ऑडीट दर्जा राखला आहे. परंतु वाढते काम, कमी मनुष्यबळाचा विचार करुन आ. थोरात, मधूकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन सिताराम गायकर व संचालक मंडळाने नव्याने 470 कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रथमश्रेणी अधिकारी, द्वितीयश्रेणी अधिकारी, यु. ऑफीसर, क्लर्क, शिपाई आदिंचा समावेश आहे. या सर्व परिक्षा ऑनलाईन व पारदर्शकपणे होणार आहे. यासंबधीची जाहिरात जुनच्या पहिल्या आठवड्यात वृत्तपत्रांतून प्रकाशित केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
आ. थोरात म्हणाले, कर्मचार्‍यांनी बॅक ही आपली मातृसंस्था म्हणून कायम जपली आहे. संचालक मंडळानेही उत्तम कारभार करुन लौकिक वाढविला. जिल्हा बॅकेत होणारी भरती ही पुर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारीत राहिल. कमी कर्मचारी संख्या असतांनाही पुर्ण कार्यक्षमतेने काम केल्यामुळे हे यश मिळत आहे. यापुढेही असेच गुणवत्तापुर्ण काम होत राहिल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, कुटुंबाचा किंवा समाजाचा विकास हा अर्थिक विकासातून होत असल्याने अनेक कुटुंबांना उभे करण्याचे काम जिल्हा बँक करत आहे. काटकसर, नियोजन, कर्जवाटप व कर्ज फेड यासाठीचे परिश्रम यावर प्रत्येक बँकेचे यश अवलंबून असते. आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासतांना सामान्य माणसांमध्ये मोठा विश्‍वास निर्माण करुन त्यांच्या प्रगतीत योगदान दिले.
बापूसाहेब गिरी म्हणाले, आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली बॅकेतील सेवकांना 3000 ते 9000 अशी भरघोस पगारवाढ मिळाल्याने सर्व कर्मचारी या समाधानी आहे.
यावेळी बाजीराव खेमनर, शिवाजीराव थोरात यांचीही भाषणे झाली. यावेळी तालुक्यातील शेतकरी व जिल्हा बॅकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.