Breaking News

संगमनेरात शिवसेनेचा रास्तारोको

संगमनेर, दि. 01 - शेतकरी वर्गाचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा उतारा कोरा करा, त्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने काल मंगळवारी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या संपात सत्तेत असलेल्या शिवसेनेने तसे समर्थनच केल्याचे या आंदोलनामुळे पुढे आले आहे.
राज्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. अवकाळी आपत्तीने त्यांचे होत असलेले नुकसान, कमी पर्जन्यमान, शेती मालाला भाव नाही, बँका, पतसंस्था, सोसायट्या व खाजगी सावकाराचे देणे, जमिनी गहाण पडलेल्या अशा विविध कारणांनी शेतकरी वर्ग ग्रासला आहे. त्यामुळे राज्यात शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्मत्या होत आहेत. शासन कुठलेही ठोस पावले उचलत नसल्याने शेतकरी वर्गाने संपाचे हत्यार उपसले आहे. तरी शेतकरी वर्गाचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कोरा करा, तसेच शेतीमालाला हमी भाव द्या अशा मागण्या शिवसेनेच्यावतीने या रास्तारोको आंदोलनात करण्यात आल्या. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अ‍ॅड. दिलीप साळगट, अमोल कवडे, रमेश काळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, ज्ञानेश्‍वर कांदळकर, अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे, दगडू रहाणे, इम्पितयाज शेख, फैजल सय्यद, दिपक मुळे, सतिश जोशी, लहानभाऊ जोंधळे, बाळासाहेब देशमुख, विकी गायकवाड, भाऊसाहेब सातपुते, त्रिलोक कतारी, ऋषीकेश शिंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. जवळपास तासभर सुरु असलेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर दुरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीस खोळंबा झाला होता.